नवी दिल्ली – सोमवारी भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात भक्कम वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारांमध्ये सोन्याची खरेदी वाढली आहे. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
सोमवारी भारतीय सराफात सोन्याचा भाव 411 रुपयांनी वाढून 47,291 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेला. त्याचबरोबर तयार चांदीचा भाव 338 रुपयांनी वाढून 68,335 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
सोमवारी भारतीय रुपयाचे मूल्य 52 पैशांनी कमी झाले. गेल्या आठवड्यातही रुपयाने सपाटून मार खाल्ला आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती अनिश्चित असल्यामुळे डॉलर वधारत असल्याने आणि रिझर्व बॅंकेने या वर्षी एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी रोख्यांची खरेदी करणार असल्याचे जाहीर केल्यामुळे रुपयाच्या मूल्यात घट होत आहे.
रुपयाचे मूल्य कमी झाल्यानंतर सोन्याची आयात महागात पडते. त्यामुळे सोन्याचे दर वाढत असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
जागतिक बाजारात सोमवारी सोन्याचा दर 1,787 डॉलर तर चांदीचा दर 26.06 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला. जागतिक परिस्थिती जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत सोन्याचे दर वाढण्याची शक्यता गेल्या आठवड्यात बऱ्याच विश्लेषकांनी व्यक्त केली होती. त्यानुसार सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.
महागाइ वाढण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेबरोबरच इतर देशांच्या सरकारी रोख्यावरील परतावा वाढत आहे. तर दुसरीकडे डॉलर वधारत आहे. ही परिस्थिती सोन्याच्या दर वाढीसाठी पोषक असते असे विश्लेषकांनी सांगितले.
आठ महिन्यापूर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये करोनाची परिस्थिती बरीच सुधारली होती. त्यावेळी सोन्याचा दर 45 हजार रुपयांपर्यंत कमी झाला होता. मात्र आता त्यामध्ये हळूहळू वाढ होत आहे. आगामी काळात भारतामध्ये लग्नासाठी सोन्याची खरेदी वाढण्याची शक्यता आहे.