लग्नसराईमुळे सोन्या-चांदीच्या मागणीत वाढ

दर स्थिर असल्याने मागणी वाढली

पिंपरी – शहरात कोणताही सण असो सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात हमखास होते. दसरा, दिवाळीत सराफ बाजार गजबजलेला असतो. आता हे सण संपल्यानंतरही पुन्हा सराफ बाजार गजबजू लागला आहे. लग्नसराईला सुरुवात झाल्यामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी वाढल्याचे सराफा बाजारातून सांगण्यात आले.

मागील महिन्याज सण आणि उत्सावामुळे सोन्या-चांदीच्या मागणीमध्ये काही प्रमाणात वाढ झाली होती. सोन्याची मागणी वाढलेली असली तरी मागील एक महिना भरापासून अपवाद वगळता सोन्याचे दर स्थिर आहेत. आता लग्नसराईला सुरुवात झाल्याने सराफ व्यापाऱ्यांची दुकाने पुन्हा एकदा गजबजू लागली आहेत. सोन्याचे दर स्थिर असल्याने अनेक जण अगोदरच सोने खरेदीला पंसदी देत असल्याने लग्नसराईच्या सुरुवातीलाच सराफा दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

मंगळवारी सोन्याचे दर 38 हजार 400 रुपये तोळा एवढे होते. तर चांदी 45 हजार 800 रुपये किलो होती. जुलै 2019 मध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 35 हजार रुपये होते. मात्र, सप्टेंबर महिन्यापर्यंत सोन्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि सोन्याचे दर 38 हजार 795 रुपयापर्यंत पोहचले होते. त्यानंतर ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात महिन्यात मात्र दर स्थिर राहिले आहेत. यावर्षी जवळपास 50 लग्नसराईचे महुर्त आहेत. यामुळे, राणीहार, हातातील तोडे यासारख्या सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढली आहे. याबरोबरच चांदीच्या समई आणि इतर चांदीच्या वस्तुंच्या मागणीतही वाढ झाली आहे.

सोन्या-चांदीचे दर महिनाभरापासून स्थिर असल्याने अनेक जण सोने-चांदीच्या खरेदीसाठी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून लग्नसराईमुळे पुन्हा सोन्याच्या दागिण्याची मागणी वाढली आहे. दिवाळीनंतर सुरवातीचे आठ दिवस मागणी थोडी कमी झालेली होती. मात्र, आता लग्नसराई सुरु झाल्यामुळे पुन्हा मागणी वाढली आहे.
– मिलींद वेदपाठक, सराफ व्यापारी

Leave A Reply

Your email address will not be published.