सातारा – कोडोलीतील दत्तनगरात चोरट्यांनी घरफोडी करून दोन लाख 85 हजार रुपयांचा ऐवज चोरणाऱ्या निशांत संजय अडागळे (चिंचणेर, ता. सातारा), महेश हणमंत धनवडे (रा. गोडोली) व निकेश अंकुश साठे (रा. कोडोली) यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने अटक केली आहे.
दरम्यान, त्यांच्याकडून साडेआठ तोळ्यांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी ज्योती प्रकाश नलवडे यांनी गेल्या वर्षी 24 डिसेंबरला फिर्याद दिली होती.
याबाबत माहिती अशी, ज्योती नलवडे या दि. 12 ते 23 डिसेंबर या काळात बाहेरगावी गेल्या होत्या. त्या 24 डिसेंबरला घरी आल्यावर दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.
चोरीचा संशय आल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घराची पाहणी केली असता चार तोळ्यांची मोहनमाळ, तीन तोळे वजनाचा राणीहार, एक तोळ्याची सोनसाखळी, व रोख रक्कम मिळून दोन लाख 85 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.