मुंबई – कोरोना महारोगराईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे 2020 मध्ये सोन्याची मागणी अत्यंत कमी राहिली होती. मात्र, या वर्षी (वर्ष 2021) देशातील बाजारात सोन्याच्या मागणीत वेगाने वाढ होईल. जागतिक सुवर्ण परिषदेनुसार (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल अर्थात डब्ल्यूजीसी) 16 जानेवारीपासून देशात कोरोना महारोगराई रोखण्यासाठी लसीकरण सुरू झाल्यावर स्थिती वेगात बदलेल आणि सोन्याच्या मागणीत वाढ होईल.
भारतात डब्ल्यूजीसीचे एमडी सोमसुंदरम पी.आर. यांनी एका मुलाखतीत सांगितले की, महारोगराईमुळे गेल्या वर्षी जे विवाह लांबणीवर टाकले, ते या वर्षात होतील.त्यामुळे दागिन्यांची खरेदी वाढेल आणि त्यामुळे सोन्याची मागणी जोर पकडेल. सध्याची स्थिती संकेत देत आहे की, 2021 मध्ये सोन्याची मोठी मागणी होईल. एखाद्या अनपेक्षित घटनेमुळे परिणाम होऊ शकतो, परंतु सध्या तशी स्थिती दिसत नाही. चीननंतर सोन्याची सर्वात जास्त विक्री भारतात होते.
वर्ष 2020 मध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावलेल्या देशव्यापी टाळेबंदीत किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्यामुळे देशातील बाजारात सोन्याच्या मागणीत घट आली होती. काही महिन्यांत स्थितीत वेगवान सुधारणा होत आहेत. शनिवारी, दि. 16 जानेवारी रोजी संध्याकाळी बंद झालेल्या बाजारभावाप्रमाणे सोन्याचा 10 ग्रॅम्सचा दर हा 50,085 इतका आहे. आता मागणी वाढल्यावर दरात घट होते का, हे पहाणेही रंजक ठरणार आहे.
सोन्याबरोबरच चांदी खरेदी, प्रेशियस जेमस्टोन्स आणि डायमंडच्या खरेदीतही वाढ अपेक्षित आहे. राशींचे खडे मानसिकरित्या खचलेल्या माणसांना दिलासा देतात, असे दिसून आल्याने अनलॉक प्रक्रियेनंतर सोन्याखालोखाल जेम स्टोन्सला मागणी वाढते आहे, असे दिसून आले आहे. त्यामध्ये पुष्कराज, मोती आणि गोमेदसारख्या जेमस्टोन्सला विशेष मागणी असल्याचे दिसून येत आहे.