देशहितासाठी जेलमध्ये जाणे हा अलंकार – हजारे

पिंपरी  -समाज आणि देश हितासाठी जेलमध्ये जाणे हा आमचा अलंकार आहे, असे मत पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘श्‍यामची आई सन्मान’ सोहळा राळेगणसिद्धी येथे झाला.

या वेळी टाटा मोटर्सचे विरिष्ठ निवृत्त अधिकारी मनोहर पारळकर आणि त्यांच्या आई सुशीला पारळकर यांना हजारे यांच्या हस्ते “श्‍यामची आई’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते.

या वेळी नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे दिनेश आवटी, निवड समितीचे प्रमुख कवी उद्धव कानडे, ज्येष्ठ साहित्यिक विश्‍वास वसेकर आदी उपस्थित होते.हजारे म्हणाले, शब्दाला कृतीची जोड दिली पाहिजे. त्यासाठी आपले आचार विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवन निष्कलंक असावे. त्याग जीवनात फार महत्वाचा असतो. तसेच शिक्षणातून माणूस घडत गेला पाहिजे.

पोपटराव पवार म्हणाले, निसर्ग आणि माणूस ज्या शिक्षणाने आणि संस्कारांनी जोडलेला होता, तो आज संपलेला आहे. येत्या काळात निरोगी आणि निर्व्यसनी मुले ज्यांच्या घरात असतील तो सर्वांत श्रीमंत व्यक्ती असेल. पुरस्काराला उत्तर देताना मनोहर पारळकर म्हणाले, आजचा पुरस्काराचे श्रेय आईचा त्याग आणि संस्काराला जाते. त्यागातूनच संस्कार होतात. प्रकृती कारणास्तव सुशीला पारळकर उपस्थित राहू शकल्या नाही.

सोहळ्यात भोसरीतील श्रीराम प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक लालासाहेब जगदाळे यांना साने गुरुजी विचार साधना पुरस्कार, तसेच जगन्नाथ शिवले, सुबोध गलांडे आणि श्रीकांत चौगुले यांचा “साने गुरुजी शिक्षकप्रतिभा’ पुरस्कार देऊन सन्मान केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.