खरीप पिकांसाठी गोदावरी कालव्यांना पाणी सोडा : स्नेहलता कोल्हे

उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभागाला दिले निवेदन
जलसंपदामंत्री महाजन यांच्याकडे केली मागणी 

कोपरगाव  – मागील वर्षी पर्जन्यमान चांगले झाले नाही. चालू वर्षी देखील दोन महिने होऊनही पावसाने ओढ दिलेली आहे. जो पाऊस झाला, त्यावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पाऊस नसल्याने ही पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे या पिकांसाठी गोदावरी कालव्यातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

आ. कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघात, तसेच राहाता परिसरातील दहा गावांत पुरेशा प्रमाणात पाऊस नाही. त्यामुळे नागरिकांसह जनावरांचे पिण्याच्या पाण्याचे हाल होत आहेत. त्यासाठी गोदावरी कालव्यातून नुकतेच पिण्याचे पाणी सोडण्यात आले. तरीही अनेक ठिकाणी अद्यापही पाण्याची टंचाई आहे. खरीप पिकांची पेरणी काही शेतकऱ्यांनी केली. पण पावसाने डोळे वाटारल्याने खरिपाचीही वाट लागली आहे. शेतकरी पाण्यांच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या दारणा, गंगापूर धरणांत पाण्याचा साठा बऱ्यापैकी आहे. नाशिक, ईगतपुरी भागात पाऊस चांगला आहे. गोदावरी नदीला सध्या पावसाचे पाणी सोडले जात आहे. तेंव्हा या खरीप पिकांना जीवदान देण्यासाठी तातडीने गोदावरी कालव्यांना पाण्याचे आर्वतन सोडावे. जेणेकरून या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही आ. कोल्हे म्हणाल्या. या संदर्भात त्यांनी उत्तर महाराष्ट्र जलसंपदा विभाग, औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, नाशिक येथील कार्यकारी अभियंता, पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी चर्चा करून या प्रश्नाची तीव्रता लक्षात आणून दिली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.