देवा! पुणे शहरात लसींचाही तुटवडा

फक्‍त 4 हजार डोस शिल्लक : काही केंद्र आज बंद ठेवावी लागणार

पुणे – शहरात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहराच्या नारायण पेठेतील लसीकरणाच्या मध्यवर्ती भांडारात केवळ 4 हजारच डोस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे गुरूवारी अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद राहण्याची शक्‍यता आहे.

संपूर्ण राज्यात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. पुण्यात दररोज सुमारे 18 ते 19 हजार लसीकरण होते. याशिवाय सरकारी आणि खासगी मिळून 140 लसीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. बुधवारी दिवसभरात बहुतांश लसीकरण केंद्र सुरू होते. परंतु काही केंद्रांना महापालिकेकडून लसच मिळाली नसल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. लस कधी उपलब्ध होणार याबाबत राज्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. अजमितीला चार हजारच डोस शिल्लक असल्याचे महापालिका आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

मिळालेली कोवॅक्‍सिन दुसऱ्या डोससाठीच वापरा
तीन दिवसांपूर्वी राज्याला 3 लाख 45 हजार “कोवॅक्‍सिन’डोस मिळाले. त्यापैकी 68, 220 डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. त्यातील 25 हजार डोस महापालिकेच्या वाट्याला आले. हे डोस पहिल्यांदा डोस घेणाऱ्या व्यक्तीला देण्यापेक्षा ज्याचा दुसरा डोस शिल्लक आहे त्यांना द्यावा, अशा सूचना राज्याकडून देण्यात आल्या आहेत. “कोवॅक्‍सिन’ लसीचा दुसरा डोस “कोविशिल्ड’ च्या दुसऱ्या डोसप्रमाणे सहा ते आठ आठवड्यांनी द्यायचा नसून, तो 28 दिवसांनीच द्यायचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.