दूध व्यवसायाला गोचिड?

मागणी वाढ तरीही दरात कपात

– समीर भुजबळ

वाल्हे – मागील एक-दीड महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकर्‍यांना दूध दरामध्ये लिटरमागे 10 रुपये कमी केला आहेत; मात्र जनावरांचे पशुखाद्यात 100 रुपयांची वाढ केली गेली असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. तर सर्वसामान्य ग्राहकांना 48 रुपये प्रति लिटर दराने दूध तर शेतकर्‍यांच्या हातावर लिटरमागे 20-22 रुपये ठेवणारी आणि मधला 26 रुपये प्रति लिटर नफा कमवणारी व्यवस्था म्हणजेच गोचिडच… या व्यवस्थेला शोषण करणारे गोचिडच
म्हणावे लागेल.

गोचिड हा परजीवी कीटक गायी-म्हशी गुराढोरांच्या अंगावर राहतो, रक्त शोषतो. गोचिड या रक्तपिपासू कीटकाप्रमाणे दूध संघसुद्धा प्रचंड नफेखोरी करून शेतकरी बांधवांचे शोषण करीत आहेत. दूध उत्पादकांची लूट करणारे दूध संघ हे गोचिडपेक्षा घातक आहेत. गोचिड फक्त गुरांढोरांचे रक्त शोषतो तर नफेखोर दूध संघ हे गुरांढोरांसहित त्यांच्या पालनकर्त्या शेतकर्‍यांचेसुद्धा शोषण करीत आहेत, असा संताप दूध उत्पादक शेतकरीवर्गाकडून जबाबदार शासनाच्या विरोधात व्यक्त होत आहे.

“शेतकरी जनावरे टिकवायची आहेत याच उद्देशून अजून तरी दूध व्यवसाय करीत आहेत; मात्र शासनाने, शेतकर्‍यांच्या खरेदीच्या दुधाला योग्य दर वाढवून द्यावा. नाहीतर दूध डेअरी यापुढे चालवणे अवघड होत असून, परिणामी दूधसंघासह भविष्यात दूध टंचाईची अडचण निर्माण होऊ शकते. यामुळे शासनाने लक्ष केंद्रित करून दूध उत्पादक शेतकरीवर्गाला प्रतिलिटर 10 रुपये दरवाढ करावी.
– अमोल खवले, दूध डेअरी चालक, वाल्हे

मागणी वाढ तरीही दरात कपात…

कोणतेही सबळ कारण नसताना खासगी दूध संघांनी गायीच्या दूध दरात 2 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या दुधाचा दर 24 रुपयांवरून 22 रुपये प्रति लिटर आला आहे. शेतकर्‍यांसाठी दूध दरात ही कपात झाली असली तरी दूध ग्राहकांना मात्र गायीचे दूध जुन्या वाढीव दर 47 ते 48 रुपये/प्रति लिटर दराने विकत घ्यावे लागते. प्रचंड नफेखोरी करून मधले दलाल मालामाल तर शेतकरी कंगाल होत आहेत. दरम्यान, सध्या हॉटेल व्यवसायही सुरू झाला आहे. सणासुदीच्या काळात दूध आणि दुधाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. दुधाच्या पावडरचे दरही किलोमागे 200 रुपयांपर्यंत वाढले आहे. तरीही खासगी दूध संघाच्या मालकांनी एकत्र येऊन दुधाच्या दरात दोन रुपये कपात केली आहे.

“एकीकडे करोना संकट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकरीवर्ग मोठ्या आर्थिक विवंचनेत पडला असतानाच, शेतीला पूरक व्यवसाय म्हणून, शेतकरीवर्ग दूध उत्पादक बनला होता. मात्र, बाटली बंद पाण्याच्या किमतीपेक्षा कमी किमतीत गायीच्या दुधास बाजारभाव मिळत असल्याने, शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला असून, गायीच्या दुधाला किमान 32 रुपये प्रति लिटर दर मिळाला तरच हे शेतकरी दूध व्यवसायात तग धरू शकतो.
– भाऊसाहेब पवार, दूध उत्पादक शेतकरी वाल्हे.

दूध दरवाढीबाबत राजकीय नेते उदासीन…

शेतकर्‍यांच्या दूध प्रश्‍नांवर सरकार तसेच विरोधी पक्ष गंभीर नाही. सरकार लक्ष देत नाही आणि विरोधी पक्ष फक्त फोटोपुरते आंदोलन करतो. त्यामुळे आपली घुसमट कोणाकडे मांडावी हाच प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे. राजकीय नेत्यांना दूध दरकपातीबाबत गांभीर्य नसण्याचे कारण म्हणजे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघ राजकीय नेत्यांच्या वर्चस्वाखाली आहेत. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध ग्राहकांची लूट हा एकमेव अजेंडा या लोकांचा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.