शेळी चोरांचा ग्रामस्थांच्या दिशेने गोळीबार

शेवगाव -तालुक्‍यातील लाडगाव येथील शेतकऱ्याच्या शेळ्या चोरटे चोरून नेत असताना त्यांना ग्रामस्थांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. चोरटे शेकटे खुर्द शिवारात आले असता, त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यावेळी पाठलाग करणाऱ्या ग्रामस्थांच्या दिशेने चोरट्यांनी गोळीबार केला. तसेच अंधाराचा फायदा घेत ते पळून गेले. ही घटना गुरुवारी (दि.15) पहाटेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, लाडजळगाव येथील पैठण-पंढरपूर रस्त्यालगत मधुकर सदाशिव पाटील यांचा शेळ्यांचा गोठा आहे. या गोठ्यातून काही चोरट्यांनी मध्यरात्री दोन शेळ्या चोरल्या. मात्र या शेळ्यांच्या आवाजाने शेजारीच घर असलेले जालिंदर पाटील यांना जाग आली. ते घराबाहेर आले असता, त्यांना काही चोरटे शेळ्या वाहनात टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली.

आरडाओरडीने परिसरातील शेतकरी जागे झाले व त्यांनी पाटील यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत चोरटे घोगस पारगावच्या दिशेने पळून गेले. यावेळी ग्रामस्थांनी घोगस पारगाव येथील ग्रामस्थांना मोबाइलवरून या घटनेची माहिती दिली. त्यामुळे घोगस पारगाव येथील ग्रामस्थांनी रस्ता बंद केला. रस्ता बंद पाहून चोरटे पुन्हा माघारी फिरले.

येथील ग्रामस्थ शेकटे खुर्द येथील खडी क्रशरनजीक दबा धरून बसले होते. चोरटे शेकटे येथे येताच ग्रामस्थांनी त्यांच्या दिशेने दगडफेक केली. दगडफेक होत असल्याचे पाहून चोरट्यांनी ग्रामस्थांच्या दिशेने हवेत गोळीबार केला. तसेच वाहन कच्च्या रस्त्याने नेले. मात्र रस्ता खराब असल्याने वाहनास अपघात झाला.

ग्रामस्थ आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून चोरट्यांनी वाहन सोडून अंधाराचा फायदा घेत तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच बोधेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव पवार, संपत एकशिंगे, उमेश गायकवाड, तसेच शेवगाव येथे पेट्रोलिंग करणारे पोलीस कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्यांच्या वाहनाची तपासणी केली असता, एक शेळी मृतावस्थेत आढळली. तसेच एका महिलेच्या आधार कार्डची झेरॉक्‍स सापडली आहे. शुक्रवारी मधुकर पाटील यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.