स्क्वॅशचा प्रसार करण्याचे ध्येय – प्रदीप खांडरे

पुणे: जागतिक स्क्वॅश दिनाच्या निमित्ताने भारतीय स्क्वॅश रॅकेट संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून समस्त क्रीडा शौकिनांमध्ये स्क्वॅशचा प्रसार करण्याचे लक्ष्य ठेऊन संघटना प्रशिक्षण शिबिरे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा, पंचांच्या कार्यशाळा, तसेच एक, दोन तीन लेव्हलच्या प्रशिक्षकांसाठी पदविका वर्ग हे उपक्रम राबविणार आहे.

यावेळी बोलताना महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांडरे म्हणाले कि, गेल्या काही वर्षांपासून भारतीय स्क्वॅश रॅकेट संघटनेने एक दीर्घकालीन योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून भारताला जागतिक स्तरावर स्क्वॅशमधील एक महासता बनविणे हे लक्ष्य ठेऊन आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ते पुढे म्हणाले की, हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रामुख्याने कुमार खेळाडूंचा विकास घडविण्याकडे आम्ही लक्ष देत असून गेल्या दशकांतील त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहोत. त्यातही गेल्या काही वर्षात आमचे खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकू लागल्याने भारतीय स्क्वॅश योग्य मार्गावर असल्याची आमची खात्री झाली आहे.

तसेच, भारतीय संघ तयार करण्यासाठी दीर्घकालीन निकषांवर प्रशिक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पूर्ण वेळ व्यावसायिक स्क्वॅश खेळाडू होण्यासाठी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन योजनादेखील सुरू करण्यात आली आहे.
डॉ. खांडरे पुढे म्हणाले की, तांत्रिक आणि डावपेचात्मक बाजूमध्ये सुधारणा केल्यास खेळाडूंना त्यांच्या नियमित प्रशिक्षणा सोबत गुणवत्तेत मोठाच फायदा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.