NDAला मोठा धक्का! ‘गोवा फाॅरवर्ड’ पक्षाने सोडली साथ

पणजी – भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला गोव्यातून मोठा धक्का बसला आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वात गोवा फॉरवर्डची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. यामध्ये एनडीएबाहेर पडण्याचा ठराव एकमताने संमत झाला.

25 जानेवारी 2016 रोजी सरदेसाईंनी गोवा फॉरवर्ड पार्टीची स्थापना केली होती. 2017 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत जीएफपीने चार उमेदवार उभे केले होते. विशेष म्हणजे यापैकी तीन जागांवर पक्षाला विजय मिळाला.

गोव्यात मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पक्षाला सत्तेत परत येण्यामध्ये गोवा फॉरवर्ड पार्टीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. खरं तर पक्षाची स्थापना करताना झालेल्या पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी आघाडी करण्याची भूमिका जाहीर केली होती.

2017 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचा प्रचारही भाजपविरोधी होता. भाजपला सत्तेबाहेर खेचण्यासाठीच गोवा फॉरवर्ड पार्टीने रणशिंग फुंकले होते. कॉंग्रेस-भाजपमधील अनेक नेत्यांनी गोवा फॉरवर्ड पार्टीत पक्षप्रवेशही केला होता. 2017 मध्ये तत्कालीन अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनीही पक्षाचा झेंडा हाती धरला. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या तिकीटावर निवडणूक लढवून विजय मिळवला.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत गोव्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती. 40 पैकी 21 हा बहुमताचा आकडा गाठण्यात कुठल्याही पक्षाला यश आलं नाही. अखेर 17 जागांसह मोठा पक्ष असलेला कॉंग्रेस सत्तास्थापनेचा दावा करण्याच्या तयारीत होती. त्याआधीच 13 जागांसह भाजपने गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी (मगो) आणि अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापन केली. त्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर टिंबळे यांनी पदाचाही राजीनामा दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.