गोव्यात नव्याने स्थापन झालेल्या भाजप सरकारने वर्षभरात तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात हे आश्वासन दिले होते. त्यामुळे भाजपने दिलेले आश्वासन सत्त्यात उतरले आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री सावंत यांच्याशिवाय त्यांचे आठ मंत्रिमंडळातील सहकारी मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. सावंत म्हणाले की, भाजपने दिलेल्या आश्वासनानुसार नवीन आर्थिक वर्षापासून तीन घरगुती एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील.
गेल्या महिन्यात झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने पुन्हा सत्तेत आल्यास दरवर्षी तीन एलपीजी सिलिंडर मोफत दिले जातील, असे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, लोहखनिज खाणीतून पुन्हा खाणकाम सुरू करणे आणि रोजगार निर्मिती करणे हे त्यांच्या सरकारचे प्राधान्य आहे.