लखनौ : मीरतमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना “पाकिस्तानात जा’ अशी सूचना पोलीस अधिकाऱ्यांकडून होणे दुर्दैवी असल्याची टीका बसपा नेत्या मायावती यांनी केली आहे. अशी सूचना करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही मायावती यांनी केली आहे.
“उत्तर प्रदेशात आणि देशात राहणारे मुस्लिम हे भारतीयच आहेत. ते पाकिस्तानी नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधी आंदोलनादरम्यान जातीय भाषा वापरणे निषेधार्ह आणि दुर्दैवी आहे.’ असे मायावती यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
अशी सूचना करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची चौकशी व्हायला हवी. त्यानंतर त्या अधिकाऱ्याची हकालपट्टी व्हायला हवी, असेही मायावती एका अन्य ट्विटमध्ये म्हणाल्या.
मीरतमधील आंदोलनादरम्यान पोलीस अधिक्षक अखिलेश नारायण सिंह यांनी आंदोलकांना उद्देशून “पाकिस्तानच्या घोषणा द्यायच्या असतील, तर पाकिस्तानात जा.’ अशी सूचना केली होती. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मात्र आंदोलक पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा देत असल्याचे स्पष्टिकरण सिंह यांनी दिले आहे.