औद्योगिक ग्राहकांची कोंडी : सुसूत्रतेची मागणी
पुणे – औद्योगिक वापरासाठी 20 अश्व शक्ती असणारे वीज मीटर पुणे विभागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, हे मीटर घेण्यासाठी मुंबई येथील कार्यालयाची परवानगीची आवश्यकता असल्याचे सांगत मीटर देण्यास टाळाटाळ केली जात आहे. याबाबत, संबंधित कार्यालयाने स्थानिक मंडलातील अभियंत्यांना सूचना देऊन मीटर वाटपात सुसूत्रता आणण्याची मागणी, महाराष्ट्र विद्युत सनियंत्रण समितीने केली आहे.
औद्योगिक वापरासाठी लागणारे वीज मीटर्स नवीन घेण्यासाठी अथवा बंद पडल्यानंतर नवीन मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील अभियंत्याच्या परवानगीशिवाय सदर मीटर मिळत नाहीत. तसेच, वाढीव वीज भार एखाद्या ग्राहकास घ्यावयाचा झाल्यास त्यास देखील वरिष्ठ कार्यालयाची परवानगी येत नाही, तोपर्यंत मीटर्स बसवू शकत नसल्याचे सांगितले जाते. औद्योगिक वापरासाठी 20 अश्व शक्तीचे लागणाऱ्या वीज मीटर्स बाबतीत वरिष्ठ कार्यालयाचा हस्तक्षेपामुळे ग्राहकांना त्रास होत आहे. पण, हे वीज मीटर लवकरात-लवकर मिळणे आवश्यक आहे.
एखाद्या मीटरमध्ये बिघाड झाल्यास ग्राहकांना तत्काळ नवीन मीटर मिळण्याची गरज आहे. मात्र, सद्यस्थितीत अनेक कार्यालये मुंबईहून परवानगी आल्याशिवाय 20 अश्वशक्तीचे मीटर मिळत नसल्याचे सांगतात. या प्रक्रियेसाठी दोन ते तीन महिने जात असल्याचे, विद्युत सनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी सांगितले.