‘निवडणूक काळात उशिराच घरी जा!’

अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना अनोखा सल्ला

पुणे – “महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणुका होत आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाचा उमेदवार चांगल्या मताधिक्‍क्‍याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. या कालावधीत रात्री जरा उशिराच घरी जा, असा अनोखा सल्ला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. केवळ लग्न आणि साखरपुड्यांना हजेरी लावून प्रचार करण्यापेक्षा तळागाळात जाऊन प्रचार करा,’ अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी बोलताना पवार यांनी हा सल्ला दिला. खासदार अॅड. वंदना चव्हाण, शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील, माजी आमदार अॅड. जयदेव गायकवाड, बापूसाहेब पठारे, कमल ढोले पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, रविंद्र माळवदकर, राजलक्ष्मी भोसले, जालिंदर कामठे, सुरेश घुले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. यावेळी रिपाइंच्या आठवले गटाचे श्रमिक ब्रिगेड आघाडीचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.

निवडणूक काळात कार्यकर्त्यांनी दक्षता बाळगण्याची आवश्‍यकता असते. त्यामुळे आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला आणि उमेदवाराला त्रास होईल, अशी विधाने करु नका असे पवार यांनी केले. भाजप प्रलोभने आणि दबावाचे राजकारण करत आहे. हद्दपारीची नोटीस आणि चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावण्याची भीती भाजपच्यावतीने दाखविली जात आहे. भाजप सरकारकडून घटनात्मक संस्थांचा वापर राजकीय स्वार्थासाठी होत आहे, मागील दाराने आणलेली ही एक प्रकारची आणीबाणीच आहे, असा आरोपही पवार यांनी केला.

राफेलबाबत सरकारचे मौनच
540 कोटी रुपयांचे राफेल विमान तब्बल 1,600 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले, यावर सरकारवर चौफेर टीका होत आहे. मात्र, सरकारच्या वतीने कोणीही भूमिका मांडत नाही. भाजप सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. हे वास्तव असतानाही गेल्या साडेचार वर्षांत त्याबाबत कोणत्याही उपायायोजना करण्यात आलेल्या नाहीत, असा आरोपही पवार यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.