राजगुरूनगर – तब्बल 16 वर्षांनंतर आमदार दिलीप मोहिते पाटील आणि शरद बुट्टे पाटील एकत्र आल्याने त्यांची दिलजमाई झाली असून त्यांनी आपापली भूमिका पत्रकार परिषदेद्वारे स्पष्ट केले. या पत्रकार परिषद समयी जिल्हा परिषेदेचे माजी कृषी सभापती अरुण चांभारे, भाजपा युवामोर्चाचे तालुकाध्यक्ष काळूराम पिंजण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील देवकर, माजी सरपंच दत्तात्रय मांडेकर, शिवाजी डावरे, युवानेते मयूर मोहिते, सचिन लांडगे आदी उपस्थित होते.
आमदार मोहिते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून शरद बुट्टे पाटील आणि आम्ही एकत्रित पणे समाजकारण केले आहे. त्यांचा जनसंपर्क आणि विकास कामे करण्याची हातोटी, चिकाटी व प्रामाणिकपणा यावरून त्यांना नजीकच्या काळात मोठ्या पदाची संधी मिळेल.
शरद बुट्टे पाटील म्हणाले, गैरसमजातून आमदार मोहिते यांनी माझ्या विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीची दावा लावला होता. आमच्यात कोणतेही वैयक्तिक वाद नाहीत. राजकीय वाटचालीत पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आम्ही काम करीत आहोत. खेड तालुक्याचा विकास झाला पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे. आम्ही विरोधासाठी विरोध न करता तालुक्याच्या विकासासाठी तडजोड केली आहे.
आमच्या राजकीय भूमिका वेगवेगळ्या राहतील; मात्र आमच्यात वैयक्तिक प्रत्यारोप- वाद यापुढे राहणार नाहीत. आजच्या या तडजोडीतून तालुक्याच्या विकासासाठी एक पाऊल पुढे टाकत मनमोकळ्या पणाने कटुता काढून टाकली आहे व बॅंकेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तालुक्याच्या विकासासाठी दोन्ही दिग्गज नेते वैयक्तिक हेवेदावे विसरून एकत्र आल्याने तालुक्यात राजकीय चर्चा रंगणार आहेत.
माघार सगळ्यांशी चर्चा करूनच
पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील माघार ही पक्षाचे नेते बाळा भेगडे, अतुल देशमुख तालुका अध्यक्ष शांताराम भोसले यांच्याशी चर्चा करून घेतली आहे. तालुक्याच्या विकासासाठी तडजोड केली आहे, असे शरद बुट्टे पाटील यांनी स्पष्ट केले.