विज्ञानविश्‍व: हिमनद्यांना ऊब ब्लॅंकेटची

डॉ. मेघश्री दळवी

ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आता केवळ कागदावर किंवा भविष्यात राहिलेला नाही. त्याचे वेगवेगळ्या स्तरांवरचे परिणाम आपण पाहतो आहोत, भोगतो आहोत. एकीकडे प्रचंड तापमानवाढ, दुसरीकडे पूर आणि चक्रीवादळं, तर तिसरीकडे आर्क्‍टिक प्रदेशाहूनही भयंकर थंडी. ध्रुवीय बर्फसाठे कमी होत आहेत आणि हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत अशा बातम्या आता नवीन नाहीत. प्रश्न आहे तो आपण यावर काय उपाय करणार आहोत हा. गेल्या आठ-दहा वर्षांमध्ये मात्र ग्लोबल वॉर्मिंगबाबत जागरुकता वाढते आहे. जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे प्रयोग करून पाहणे चालले आहेत. त्यासोबत वैयक्तिक पातळीवरही आपला कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा प्रयत्न अनेकजण सजगतेने करताना दिसत आहेत.

हिमनद्यांचं (ग्लेशियर्स) वितळणं रोखण्यासाठी आता अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू आहेत. हिमनद्या म्हणजे एक प्रकारच्या गोठलेल्या नद्या, किंवा काही वेळा समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या प्रचंड लाद्या. अनेकदा हिमनगांचे (आइसबर्ग) कडे तुटतात आणि तेही असे तरंगू लागतात. हिमनद्या या हिमनगाप्रमाणे एका जागी स्थिर नसतात, तर हळूहळू सरकत असतात. त्यांच्यातला बर्फ हा ताजा आणि बराचसा भुसभुशीत असल्याने त्या वितळण्याचं प्रमाण अधिक असतं.

उत्तरेला ग्रीनलॅंड, आइसलॅंड, कॅनडा, अलास्का, आणि आर्क्‍टिक प्रदेशात, तर दक्षिणेला चिली आणि अंटार्क्‍टिकामध्ये प्रचंड हिमनद्या आहेत. युरोपमध्ये अनेक ठिकाणीही हिमनद्या आढळतात आणि त्यांचं वितळणं थांबवण्याकरिता जर्मनी, इटली, स्वित्झर्लंड यांसारख्या देशांनी आता पुढाकार घेऊन त्यांना चक्क ब्लॅंकेट घालायला सुरुवात केलेली आहे!

ऐकताना हा उपाय विचित्र आणि विलक्षण वाटतो. पण आश्‍चर्य म्हणजे त्याचा फायदा हळूहळू दिसायला लागला आहे. स्वित्झर्लंडमधली सर्वात जुनी हिमनदी म्हणजे रोन ग्लेशियर. उन्हाळा आला की, पंधरा चौरस किलोमीटरच्या या रोन ग्लेशियरला पांढऱ्या लोकरीच्या ब्लॅंकेटनी झाकलं जातं. गेली बारा वर्षे हे काम तिथले रहिवासी आवडीने करत आहेत. सूर्याचा प्रकाश परावर्तित झाल्याने या हिमनदीच्या वितळण्याचा वेग सुमारे सत्तर टक्‍क्‍यांनी घटला आहे असा दावा शास्त्रज्ञांनी केलेला आहे. तसं असेल तर हा सोपा उपाय नक्कीच परिणामकारक म्हटला पाहिजे.

इटलीच्या उत्तर भागातल्या हिमनद्यांवर असाच प्रयोग यशस्वी झाला आहे आणि तिथे वितळण्याचं प्रमाण साठ टक्‍क्‍यांनी कमी झालं आहे. तिथे प्रेसेना या हिमनदीवर दर उन्हाळ्यात चार मिलीमीटर जाडीचं लोकरीचं पांघरूण घातलं जातं, तर जर्मनीत झ्युगस्पिट्‌झ इथल्या पाच हिमनद्यांसाठी थोड्या थोड्या प्रमाणात ब्लॅंकेटचं आच्छादन घातलं जातं. ग्रीनलॅंडमध्येदेखील असा उपाय करण्याचा विचार आहे. हिमनद्यांचं वितळणं पूर्ण थांबवता आलं नाही, तरी ते लांबवता येईल असा शास्त्रज्ञांना विश्‍वास आहे. सोबत या हिमनद्यांवर कृत्रिमरीत्या बर्फ फवारण्याचे प्रयोगदेखील सुरू आहेत. नैसर्गिकरीत्या जेवढा बर्फ वितळेल तेवढीच भर आपण पुन्हा घालायची असा प्रयत्न त्यामागे आहे.

तंत्रज्ञान वापरून भूपृष्ठावर काही चांगले बदल घडवून आणण्याच्या या शास्त्राला जिओइंजिनिरिंग म्हणतात. ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी आज जिओइंजिनिरिंगकडे आशेने पाहिलं जातं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.