नवी दिल्ली – अमूल कंपनीने एक वर्षांपूर्वी अमेरिकन बाजारात यशस्वी पदार्पण केले. अमेरिकेतील अनुभव चांगला आहे. आता अमूल युरोपियन बाजारपेठेत नोव्हेंबरच्या अखेरीस प्रवेश करणार आहे. याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे असे गुजरात सहकारी दूध विपणन संघाचे व्यवस्थापकीय संचालक जयेन एस मेहता यांनी सांगितले.
ते म्हणाले की, अमूल ब्रँड आता केवळ भारतासाठीच मर्यादित राहिला नसून जागतिक पातळीवर या ब्रँडला महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा परिस्थितीत विकसित देशांमध्ये अमूल आपली उत्पादने सहज पाठवीत आहे. अमेरिकेत आमचा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला आहे. आता आम्ही युरोपला दूध पुरवठा करणार आहोत. त्याचबरोबर इतर ताजी दुधाची उत्पादने युरोपात पाठविण्यासंदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे.
सुरुवातीला भारतीय उत्पादने स्पेनमध्ये पाठविण्यात येतील. नुकतीच स्पेनच्या अध्यक्षांनी भारताला भेट दिली आणि या संदर्भातील आवश्यक कागदपत्रावर स्वाक्षर्या करण्यात आल्या. त्यानंतर युरोपातील इतर देशात भारतीय दूध उत्पादने पाठविले जाणार आहेत.
इतर देशात भारतीय दूध उत्पादनावर शुल्क आकारले जात नाही. मात्र इतर अडथळे निर्माण केले जातात. हे अडथळे दूर करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या मदतीने प्रयत्न करत आहोत. भारतात 10 कोटी कुटुंबाकडून दुधाचा व्यवसाय केला जातो . दुधाचे मार्केटिंग व्यवस्थित झाले तर या दहा कोटी कुटुंबाचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.
भारत दूध आणि दुधाच्या पदार्थाच्या आयातीवर 30 टक्के शुल्क लावतो. हे शुल्क कमी करण्याचा सरकारचा कसलाही विचार नाही असे वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी अनेक वेळा सांगितले आहे. अमूलची गेल्या वर्षीची उलाढाल 80 हजार कोटी रुपये होती आणि निर्यात वाढल्यानंतर या उलाढालीत वाढ होणार आहे.