‘कसे आहात?’ एकमेकांना भेटलं की सामान्यतः पहिला प्रश्न हाच असतो. सहजपणे विचारल्या जाणार्या या प्रश्नाला ठीक, उत्तम, मजेत, निवांत, टकाटक यापैकी एका शब्दात उत्तर दिलं जातं. हाच प्रश्न तब्येतीसंदर्भात विचारला, तर मात्र तो ‘सहज’ राहत नाही. उत्तरसुद्धा गंभीरपणे मिळणं अपेक्षित असतं.
आजारी व्यक्तीला ‘कसे आहात,’ असं विचारलं तर तो आजाराच्या सद्यःस्थितीची माहिती देतो. परंतु पूर्णपणे निरोगी माणूस, ज्याचे सगळे व्यवहार सुरळीत आहेत, त्याला ‘कशी आहे तब्येत,’ असं विचारलं तर तो म्हणेल, ‘मला काय झालेय?’ या पार्श्वभूमीवर, जगभरातले फक्त 4.3 टक्के लोकच निरोगी आहेत, या बातमीकडे कसं पाहावं? सध्या पावसाळा लांबल्यामुळे म्हणा किंवा वातावरणात सातत्यानं होत असलेल्या बदलांमुळे म्हणा, अनेक व्यक्ती आजारी आहेत.
वेगवेगळ्या विषाणूंनी राज्याच्या अनेक शहरांत शिरकाव केलाय. दवाखान्यांत गर्दी वाढलीये. परंतु ही बातमी विशिष्ट कालावधीपुरती मर्यादित नाही. ज्या शरीरात एकही आरोग्यविषयक समस्या नाही, तीच खर्या अर्थानं निरोगी व्यक्ती ही व्याख्या प्रमाण मानली तर अशा व्यक्तींची संख्या 5 टक्केसुद्धा नाही. जगातल्या 95 टक्क्यांपेक्षा अधिक व्यक्तींना कोणती ना कोणती आरोग्यविषयक समस्या आहेच. दुसर्या शब्दांत सांगायचं झाल्यास संपूर्ण जगच ‘आजारी’ आहे. या आजारांनी देशांमध्ये आणि व्यक्तींमध्ये श्रीमंत-गरीब भेदभाव केलेला नाही. जगभरात रुग्णांची संख्या वाढत असून, डॉक्टर कमी पडत आहेत.
‘सायन्स डायरेक्ट’ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, आज प्रत्येक व्यक्तीला किमान एखादी तरी आरोग्यविषयक समस्या आहेच. 33 टक्के लोकांना पाचपेक्षा अधिक आरोग्यविषयक समस्यांचा मुकाबला करावा लागतोय. आपल्याकडे वृद्ध आजी-आजोबा नेहमी नव्या पिढीच्या आरोग्य समस्यांची खिल्ली उडवतात. परंतु धडधाकट शरीर लाभलेली ही पिढी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. आपल्या पूर्वजांनी मोठ्या कष्टाची आणि अवजड कामे सहजपणे केली. आज ती कामे कोणतीही यंत्रसामग्री न वापरता करण्याचं स्वप्नही आपण पाहू शकत नाही.
जसजशी यंत्रं आपल्या मदतीला आली, तसतशी आपली शारीरिक क्षमता कमी होत गेली. मग इलेक्ट्रॉनिक आणि नंतर डिजिटल क्रांती झाली. आज खूपच कमी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. मेंदू वापरण्याची गरज नवतंत्रज्ञानानं कमी केली. दुसरीकडे आपण तंत्रज्ञानाला मेंदू दिला. तो आपणच दिलेला असल्यामुळे मानवी मेंदूच्या पुढे जाऊ शकणार नाही, अशी भाबडी आशा आपल्याला आहे. परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता वाढल्यामुळे नव्हे, तर मानवी बुद्धिमत्ता कमी झाल्यामुळे तंत्र आपल्या पुढे जाईल, अशी भीती शास्त्रज्ञ व्यक्त करतात.
थोडक्यात, आधी आपल्या शारीरिक आणि नंतर बौद्धिक क्षमता घटत गेल्या आणि याच प्रक्रियेला आपण ‘मानवी प्रगती’ मानलं. आता एकीकडे आपण सुधारल्याच्या बढाया मारत असताना दुसरीकडे डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म विषाणू आपल्या भोवती ङ्गास आवळत चाललेत. रोगमुक्त मानवी शरीर खूप कमी शिल्लक राहिलीत, हे खरं तर 2013 मधल्या ‘ग्लोबल बर्डन ऑङ्ग डिसीज’च्या अहवालातच स्पष्ट झालं होतं. आता त्यावर शिक्कामोर्तब होऊन निरोगी माणसांची संख्या पाच टक्क्यांच्याही खाली गेली, ही आपली ‘प्रगती’!