मुंबई – हैदराबाद येथील ग्लँड फार्मा या औषध कंपनीची प्रारंभिक शेअर विक्री (आयपीओ) आजपासून खुला झाला आहे. ही कंपनी इंजेक्शनद्वारे देण्यात येणाऱ्या औषधांच्या उत्पादनांवर भर देणारी असून तिचा प्रतिशेअर किंमतपट्टा 1490 ते 1500 असा आहे. 11 नोव्हेंबरपर्यंत त्यासाठी अर्ज करता येणार आहे.
या प्रारंभिक भाग विक्रीद्वारे कंपनी गुंतवणूकदारांकडून 6,480 कोटी रुपये उभारू इच्छित आहे. त्यापैकी आयपीओच्या आधीच गेल्या आठवड्यात कंपनीने प्रमुख गुंतवणूकदारांकडून 1944 कोटी रुपये जमवले आहेत. या भागविक्रीतून कंपनीला 1250 कोटी रुपयांचा निधी नव्याने प्राप्त होणार आहे. उरलेली रक्कम ही शेअर विक्री करणारे कंपनीचे प्रवर्तक आणि समभागधारकांकडे जाईल. या आयपीओमध्ये त्यांच्याकडील 3.48 कोटी शेअरची विक्री होणार आहे, असल्याची माहिती मनीकंट्रोल या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. चीनच्या शांघायमधील फोसुन फार्मा कंपनीकडे या कंपनीचा काही हिस्सा असून फोसुन फार्मा त्यांच्याकडील 1.9 कोटी शेअर या आयपीओद्वारे विकणार असल्याची माहिती इकॉनॉमिक टाईम्सच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
शेअऱ खरेदी-विक्रीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या बहुतेक ब्रोकरेज कंपन्यांनी या शेअरबद्दल तेजीकडे कल व्यक्त केला आहे. कंपनीचा चांगला ताळेबंद, मजबूत आर्थिक स्थिती, येऊ घातलेली उत्पादनांची मालिका, मजबूत बिझनेस मॉडेल, फार्मा क्षेत्रातील सध्याचे सकारात्मक वातावरण आणि कंपनी ज्या क्षेत्रात काम करते तिथे पाऊल टाकण्यासाठी असलेले अनेक निर्बंध पाहता ब्रोकर्सनी या कंपनीच्या शेअरसाठी अर्ज करण्यास हिरवा कंदील दाखवलेला आहे.
2018 ते 2020 या कालावधीत कंपनीच्या महसुलात (चक्रवाढ पद्धतीने 27 टक्के वाढ) आणि करोत्तर नफ्यामध्ये (चक्रवाढ पद्धतीने 55 टक्के वाढ) जबरदस्त वाढ झाल्याचे दिसते. 2020 या आर्थिक वर्षात कंपनीवरील कर्ज अतिशय कमी आहे. डेट/इक्विटी रेशोचा विचार करते 0.01 इतके आहे.
औषध उत्पादन करताना नियमकांनी घालून दिलेले नियम व अटी पाळण्याबाबत कंपनी दक्ष असल्याचे दिसून येते. याबाबत मागील काळात कंपनीच्या कामगिरीत सातत्य आहे.
भारतात बिझनेस टू कस्टमर तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बिझनेस टू बिझनेस मॉडेलद्वारे कंपनीचे काम चाले. अत्यंत गुंतागुंतीची अशी अनेकविध उत्पादने कंपनीच्या खात्यात आहेत. या सगळ्यांसाठी कंपनीकडे अंतर्गत संशोधन आणि विकासाची सुविधा आहे. चांगला कॅश फ्लो आणि विविध पर्यायातून प्राप्ती याद्वारे कंपनीची वाढ आणि प्रगती होत असल्याचा कंपनीचा मागील इतिहास सांगतो. कंपनीकडे अनुभवी व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण टीम आहे. ही कंपनीबाबतची सर्वसाधारण ढोबळ माहिती असून गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञ व विश्वासार्ह सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.