झोपडपट्टीवासीयांना घरकुले देणार – शिवेंद्रसिंहराजे

भाजपला विजयी करण्याचा लक्ष्मी टेकडी येथील नागरिकांचा निर्धार 
सातारा – सातारा शहरात काही ठिकाणी झोपडपट्टी आहे. त्यातील अनेक ठिकाणी घरकुल योजनेच्या माध्यमातून इमारती उभ्या केल्या असून अनेकांना हक्‍काची घरे मिळाली आहेत. आजही अनेकांना घरे मिळाली नाहीत, तर काही लोकांची नावे यादीत नाहीत. आगामी काळात पंतप्रधान आवास योजनेतून झोपडपट्टीधारकांना हक्‍काची घरकुले बांधून देणार आहे, असा शब्द शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.

भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्या प्रचारार्थ लक्ष्मी टेकडी येथे सोमवारी सकाळी कोपरा सभा झाली. माजी नगराध्यक्ष निशांत पाटील, माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे, नगरसेवक श्रीकांत आंबेकर, विशाल जाधव, मिलिंद काकडे, स्नेहा नलावडे, संदीप साखरे, श्रीकांत राठोड, भारती सोळंकी, माजी सभापती साठे, लतिफभाई चौधरी, चेतन सोळंकी, वसीम सय्यद, बबलू जमादार, राजेंद्र रजपूत, भाऊ पवार, सुजित जाधव, सादिक बेपारी, मनोज सोळंकी, महेश देशमुख, किरण जगदाळे व नागरिक उपस्थित होते.

शिवेंद्रराजे म्हणाले, सातारचा सर्वांगीण विकास करताना झोपडपट्टीधारकांना हक्‍काची घरे देण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. काही ठिकाणी इमारती बांधण्यात आल्या; पण वीज कनेक्‍शन, नळ कनेक्‍शनच्या अभावी तर काही ठिकाणी आपापसातील वाद, कोर्ट केसेस, प्रशासनाची ढिलाई यामुळे काही जणांना घरकुलांचा लाभ मिळाला नाही. मात्र, ज्यांची नावे यादीत आहेत, पण घरे मिळाली नाहीत आणि ज्यांची नावे यादीत नाही, अशा सर्वांनाच आगामी काळात घरकुल योजनेचा फायदा करून देऊ.

भाजप सरकारने अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. गोरगरीब जनता, वृद्ध, युवक, विधवांसाठी असलेल्या योजनांचा फायदा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवला जाईल. भाजपच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणार आहे. प्रत्येकाला सोयीसुविधा मिळणार आहेत. आपण सर्वांनी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि लोकसभेत उदयनराजेंना आणि विधानसभेत मला निवडून द्यावे. माळवदे, निशांत पाटील, आंबेकर, स्नेहा नलावडे यांनीही शहराच्या विकासासाठी दोन्ही राजांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.