तोलणारांना काम द्या, अन्यथा हमाली बंद

हमाल पंचायतीचा इशारा : व्यापारी काम देत नसल्याचा आरोप

पुणे – मार्केट यार्डातील भुसार विभागातील व्यापारी तोलणारांना काम देत नसल्याने मागील सहा महिन्यांपासून तोलणारांची उपासमार सुरू आहे. याबाबत बाजार समितीचे दुर्लक्ष झाले असून पणनमंत्र्यांनीही कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे पुढील सात दिवसांत तोलणारांना काम न मिळाल्यास हमालही काम करणार नसल्याचा इशारा हमाल पंचायतीने दिला आहे.

बाजार समितीकडून कोणताही लेखी आदेश दिला नसताना दि.1 फेब्रुवारीपासून तत्कालीन पणन संचालक सुभाष माने यांच्या “इलेक्‍ट्रॉनिक्‍स काटे ज्या दुकानात आहेत, तेथे तोलाई कपात करू नये’ या परिपत्रकाची दि पूना मर्चंट्‌स चेंबरने थेट अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे तोलणारांची उपासमारी सुरू आहे. त्यावर बाजार समितीने तोलणारांना कामावर रूजू करून घेण्याचे आदेश देऊनही काही आडत्यांना परवाना निलंबनाची नोटीस बजावली. मात्र, त्यापुढे बाजार समितीने कोणतीही कारवाई केली नाही.

दरम्यान, आता हमाल पंचायतनेही तोलणारांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली आहे. जो व्यापारी तोलणारांना काम करू देणार नाही, त्या व्यापाऱ्याच्या दुकानावर काम न करण्याची भूमिका हमाल पंचायतने घेतल्याचे हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

…तर जाहीररित्या आत्महत्या
“राज्याचे नवीन पणनमंत्री प्रा. राम शिंदे यांनीदेखील याप्रश्‍नी अभ्यास करून निर्णय घेण्याचे सांगितले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या परिस्थितीत तोलणारांनी उपासमार आणि उपेक्षा किती काळ सहन करावी? आम्ही केलेल्या आर्थिक मदत आणि रोजगाराच्या मागणीबाबतही आपण कायद्यात नाही म्हणून निराशा केली. हा प्रकार संतापजनक आहे. तोलणारांची सहनशीलता संपलेली आहे. काही तोलणारांनी तर जाहीररित्या आत्महत्या करण्याचा इशारा संघटनेकडे दिला आहे.’ असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)