मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणारे किल्ले आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे. याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहिले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे.
महाराष्ट्रातील काही किल्ले हे भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येतात. त्यामुळे या किल्ल्यांची डागडुजी असेल किंवा विकास करायचा असेल, तर पुरातत्व खात्याच्या परवानगीशिवाय करता येत नाही. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना पत्र लिहून भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे किल्ले संवर्धन आणि देखाभाल व दुरुस्तीसाठी राज्याच्या पुरातत्व विभागाकडे देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारे महाराष्ट्रात 54 गडकिल्ले हे सध्या केंद्र केंद्रीय पुरातत्व खात्याकडे आहेत. तर 62 गडकिल्ले राज्य सरकारच्या अधिपत्याखाली आहेत. या किल्ल्यांचे संरक्षण व जतन तसेच देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य शासन प्रयत्न करत आहे. जर हे सगळे किल्ले राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाकडे दिल्यास त्यांची डागडुजी व देखभाल अत्यंत प्रभावीपणे करता येईल. म्हणून हे किल्ले राज्य शासनाकडे देण्यात यावेत, अशी विनंती आशिष शेलार यांनी पत्रातून केली आहे.