इस्लामाबाद : संपूर्ण दिवाळखोरीला निघालेला भारताचा शेजारी पाकिस्तानने आपल्या कुरापती सुरूच ठेवल्या असल्याचे दिसत आहे. कारण पाकिस्तानमधून राष्ट्रीयकृत बँकेला धमकीचा दूरध्वनी आला असून दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने आपण पाकिस्तानातून बोलत असल्याचा दावा केला आहे. फोनद्वारे “कर्ज न दिल्यास बँकेच्या अध्यक्षाची हत्या करण्याची तसेच बँकेचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची” धमकी देण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी बँकेने मरिन ड्राईव्ह पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे. बँकेच्या सुरक्षा विभागातील सहाय्यक महाव्यवस्थापकाने याप्रकरणी पोलिसांकडे गुरूवारी तक्रार केली होती. मरिन लाईन्स येथील बँकेच्या कॉर्पोरेट केंद्रावरील दूरध्वनीवर अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता.
एम. डी. झिया उलअली नावाच्या व्यक्तीने दूरध्वनी करून आपण पाकिस्तानातून बोलत असल्याचे सांगितले. सात दिवसांत कर्ज दिले नाही, तर बँकेच्या अध्यक्षाची हत्या करण्याची धमकी त्याने दिली. तसेच त्यांचे अपहरण करून कॉर्पोरेशन उडवण्याची धमकी दिली.
तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता एम. डी. झिया उल अली नावाच्या व्यक्तीने कोणत्याही कर्जासाठी अर्ज केला नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत. याबाबतची माहिती गुन्हे शाखेला देण्यात आली आहे. गुन्हे शाखेचेही पथक याप्रकरणी समांतर तपास करीत आहेत. याशिवाय राज्य दहशतवाद विरोधी पथकही याबाबत तपास करत असल्याचे सांगण्यात येत आहे.