आम्हाला आणखी कर्ज हवंय ;पाकिस्तानचीजागतिक वित्तीय संस्थांकडे मागणी

लाहोर : एकीकडे जग कोरोनाशी दोन हात करत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान सरकारसमोर पुन्हा एकदा आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान सरकारने जागतिक वित्तीय संस्थांकडे पुन्हा एकदा कर्ज मागण्याची योजना तयार केली आहे. करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पाकिस्तानला मदतीची आवश्यकता आहे, तर देशाची तिजोरी झपाट्याने रिकामी होत असल्याचे एका अहवालात सांगण्यात  आले आहे.

पाकिस्तानने जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे. त्यांनी मागितलेले हे कर्ज जी २० देशांकडून मागण्यात आलेल्या कर्जाच्या तुलनेत अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पाकिस्तानने जी २० देशांकडून १.८ अब्ज डॉलर्सच्या मदतीची मागणी केली आहे. आशियाई विकास बँकेने पाकिस्तानला करोनाच्या पार्श्वभूमीवर आपात्कालिन कर्ज म्हणून ३०.५ कोटी रूपयांची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे करोनाविरोधात लढण्यासाठी आवश्यक उपकरणं, तसेच गरीब महिलांना आर्थिक मदतही करण्यात येणार आहे.

आशियाई विकास बँक काही अटींद्वारे पाकिस्तानला कर्जाची रक्कम वाढवून देणार आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमधून १.३९ अब्ज डॉलर्सचं आपात्कालिन कर्ज आणि जागतिक बँकेकडूनही २० कोटी डॉलर्सची मदत मिळाली होती. दरम्यान, जूनपर्यंत पाकिस्तानवरील कर्जाचा बोजा वाढून तो ३७ हजार ५०० अब्ज पाकिस्तानी रुपये किंवा जीडीपीच्या ९० टक्के होणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे.  पाकिस्तान यावर्षी २ हजार ८०० अब्ज रुपयांची रक्कम केवळ कर्ज फेडण्यासाठीच करेल, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) या पक्षाचे सरकार सत्तेवर आले त्यावेळी पाकिस्तानवरील सार्वजनिक कर्जाचा बोजा २४ हजार ८०० लाख कोटी रूपये होता. त्यात आता झपाट्याने वाढ होत असल्याचंही यात नमूद करण्यात आलेआहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.