गुजरातमधील करोनाबाधितांची खरी आकडेवारी द्या; उच्च न्यायालयाचा आदेश

अहमदाबाद – गुजरात सरकारकडून करोनाविषयक चाचण्या आणि करोनाबाधितांच्या संख्येबाबत दिला जाणारा तपशील अचूक नसल्याचा समज जनतेत पसरला आहे. तो दूर करण्यासाठी खरी आकडेवारी द्या, असा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.

देशातील बहुतांश राज्यांप्रमाणे गुजरातमधील करोनाबाधितांची संख्या मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर गुजरातमधील करोना संकट आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांची दखल घेऊन उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिकेवर सुनावणी सुरू केली आहे. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने दिलेला आदेश शुक्रवारी उपलब्ध झाला. त्या आदेशात न्यायालयाने पुन्हा एकदा गुजरातमधील भाजप सरकारला कानपिचक्‍या दिल्या. खरी आकडेवारी सादर करण्यास सरकारने टाळाटाळ करू नये. खरे चित्र दडवून सरकारला काहीच मिळणार नाही. उलट खरी आकडेवारी दडवल्याने आणखी गंभीर समस्या निर्माण होतील. जनतेत भीतीचे, अविश्‍वासाचे वातावरण निर्माण होईल. त्यामुळे प्रामाणिक आणि पारदर्शक राहण्याची गरज आहे, असे न्यायालयाने अधोरेखित केले.

गुजरातमध्ये दरदिवशी आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. गुरुवारी 8 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली. तो त्या राज्यातील दैनंदिन वाढीचा आजवरचा उच्चांक ठरला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.