पंतला वेळ द्या – मोरे

मुंबई: भारताचा चर्चेत असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर सुमार कामगिरीमुळे सातत्याने टीका होत असली तरी त्याच्याकडे गुणवत्ता आहे, फक्त त्याला थोडा वेळ देण्याची आवश्‍यकता आहे, अशा शब्दात भारताचे माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी पंतची पाठराखण केली आहे.

पंतला सातत्याने संघात संधी मिळत असली तरी त्याच्या सुमार व बेजबाबदार कामगिरी संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर नियमित यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने विश्रांती घेतल्याने निवड समितीने पंतला संघात स्थान दिले. मात्र मिळालेल्या संधीचा लाभ घेण्यात पंतला अपयश येत आहे, त्यामुळे तो टीकेचा धनी बनत आहे. मात्र असे असले तरी मुळात पंतची तुलना धोनीशी करु नये. त्याला थोडा वेळ द्यायला हवा. त्याचा गमावलेला आत्मविश्‍वास तो निश्‍चितच परत मिळवेल, असेही मोरे यांनी नमुद केले.

पंत मोरेंकडेच प्रशिक्षण घेत आहेत. त्याच बरोबर कसून सरावही करत आहे, मात्र त्याचा हरवलेला आत्मविश्‍वास लवकरच परत येईल त्यासाठी त्याला टार्गेट न करता वेळ द्यायला पाहिजे, तो निश्‍चितच गुणवत्तेला न्याय देईल. संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशीही बोलणे झाले असून पंत दमदार कामगिरी करुन टीकाकारांना योग्य उत्तर देईल असा मला विश्‍वास आहे, एसेही मोरे म्हणाले.

सलग दोन मालिकांमध्ये खराब कामगिरी केल्यानंतरही पंतला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे या मालिकेत त्याची कामगिरी कशी होते यावरच त्याचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.