खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज द्या

जिल्हाधिकारी द्विवेदी ः “मिशन मोड’वर काम करण्याचे बॅंकांना निर्देश

नगर   – शेतकऱ्यांना सध्याच्या खरीप हंगामासाठी कर्ज आवश्‍यक आहे. त्यामुळे बॅंकांनी सकारात्मक भूमिका ठेवून अधिकाधिक शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे. कर्जवितरणात जाणीवपूर्वक हलगर्जीपणा करू नये. येत्या दोन आठवड्यात बॅंकांना दिलेल्या खरीप कर्ज वाटपाचे अधिकाधिक उद्दिष्ट्‌य साध्य व्हावे, त्यासाठी मिशन मोडवर काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात द्विवेदी यांनी सर्व बॅंकांच्या खरीप कर्ज वितरणाचा आढावा घेतला. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे प्रादेशिक व्यवस्थापक मीना, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक (सहकार) हरिश कांबळे यांच्यासह विविध बॅंकांचे जिल्हा व्यवस्थापक व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

यावेळी द्विवेदी यांनी प्रत्येक बॅंकांचा तपशीलवार आढावा घेतला. दि. 1 एप्रिल ते 31 मे पर्यंत आणि त्यानंतर आजपर्यंत किती शेतकऱ्यांना बॅंकांनी कर्ज वितरित केले, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. अपवाद वगळता बहुतांश बॅंकांनी अद्यापही शेतकऱ्यांना कर्ज वितरणाबाबत वेगाने कार्यवाही केली नसल्याने त्यांनी तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली. बॅंकांनी त्यांच्या शाखेमध्ये कॅम्प आयोजित करुन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करुन द्यावे, अशी सूचना त्यांनी केली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध झाले नाही, तर त्याचा काय उपयोग, अशा शब्दांत त्यांनी बॅंक प्रतिनिधींना सुनावले.

कर्ज वितरणात एका आठवड्यात सुधारणा करा. कर्जवितरण ही बाब गंभीरपणे घ्या, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे कर्ज मागणी प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत प्रलंबित ठेवू नका. वेळेवर आणि तात्काळ त्यांना कर्ज उपलब्ध करून द्या. बॅंका अशी कार्यवाही करतात की नाही, हे जिल्हा अग्रणी बॅंक अधिकाऱ्यांनी बॅंकांना अचानक भेटी देऊन तपासावे, असे द्विवेदी यांनी सांगितले. याशिवाय, राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलेल्या अनुदानाचे वाटपही धीम्या गतीने होत असल्याबाबत द्विवेदी यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंकांनी त्यांच्याकडे दिलेल्या याद्यांनुसार संबधितांच्या बॅंक खात्यात अनुदानाची तसेच मदतीची रक्कम जमा करणे आवश्‍यक आहे. मात्र, अनेक बॅंकांमध्ये ही रक्कम वितरणाविना तशीच असल्याचे दिसते. संबंधित बॅंकेच्या प्रमुखांनी सदर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर तात्काळ वर्ग करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.