सातारा – येथील बसस्थानकासमोरील रस्त्यावरून चालत जाणाऱ्या 70 वर्षीय महिलेला रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तीन महिलांनी सोन्याचे मणी देण्याचा बहाणा करून गळ्यातील सोन्याची माळ लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत माहिती अशी की, अनुसया अधिकराव फाळके (वय 70, रा. पाडळी, ता. कोरेगाव) या कामानिमित्त रविवारी साताऱ्यात आल्या होत्या. त्या कृषी उत्पन्न बाजार समिती ते शाहू क्रीडा संकुल या रस्त्याने चालत जात होत्या. तेव्हा त्यांच्याजवळ तीन महिला आल्या. त्यांनी वृध्देला “तुमच्या गळ्यातील माळ द्या, आम्ही त्याबदल्यात सोन्याचे मणी देतो,’ असे सांगून अनुसया फाळके यांच्या 20 हजार रुपये किमतीची गळ्यातील सोन्याची माळ लंपास केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहे.