मुंबई: हिंगणघाट येथील थरकाप उडवणाऱ्या घटनेतील तरुणीचा मृत्यु झाला. सुन्न आणि अपराधी वाटत आहे. इतक्या शतकांत आपण स्त्रीला प्रधानमंत्री, राष्ट्रपती,सरंक्षण मंत्री पाहू शकलो पण एका सामान्य, स्व-कर्तृत्व करणाऱ्या स्त्रीला सुरक्षा नाही देऊ शकलो. त्या क्रूर अहंकारी तरुणाला फाशी दिली पाहिजे, अशी मागणी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या, तिच्या परिवाराचे दुःख कल्पनेच्या पलीकडे आहे. ते कधीही न भरून येणारे आहे. त्यांच्या आणि समाजाच्या मनावर ओरखडे ओढणाऱ्या गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे.
हिंगणघाट येथील हल्ल्यातील पीडितेची मृत्यूची झुंज अखेर आज संपली. दरम्यान सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. त्या नराधमाला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. दरम्यान, शासनाकडून लेखी आश्वासन घेतल्यानंतर पीडितेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले.