पाचगणी पालिकेची सभा अभूतपूर्व गोंधळात

पोलिसांचा हस्तक्षेप; संतप्त विनोद बिरामणे यांचा सभात्याग

पाचगणी – विषय पत्रिकेवरील विषय वाचण्याच्या क्रमवारीवरून पाचगणी पालिकेची सभा आज अभूतपूर्व गोंधळात झाली. तब्बल सहा तास चाललेली सभा आरोप-प्रत्यारोप आणि वादावादीने गाजली. माजी उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे यांचा संयम सुटल्याने सभेत पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी बिरामणे यांना सभागृहातून बाहेर काढण्याचा आदेश दिला. त्यावर सत्ताधारी गटाने आक्षेप घेतल्याने गोंधळ वाढला. पोलीस मध्यस्थी करत असताना सत्ताधारी गट आणखी आक्रमक झाला. अखेर विनोद बिरामणे रागारागाने सभागृहाबाहेर पडले.

सभेस उपनगराध्यक्ष आशा बगाडे, मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगरसेवक विठ्ठल बगाडे, प्रवीण बोधे, सुलभा लोखंडे, उज्ज्वला महाडिक, दिलावर बागवान, रेखा कांबळे, रेखा जानकर, अर्पणा कासुर्डे, हेमा गोळे, सुमन गोळे, नीता कासुर्डे, विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, विजय कांबळे, पृथ्वीराज कासुर्डे, अनिल वन्ने उपस्थित होते.

विषय पत्रिकेवरील पहिला विषय वगळून दुसरा विषय वाचण्याची सूचना नगराध्यक्षांनी सुरुवातीसच लिपिकास दिली. त्यावर विनोद बिरामणे, नारायण बिरामणे, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे यांनी आक्षेप घेतला. त्यावर कऱ्हाडकर यांनी नगरपालिका ऍक्‍ट वाचून दाखवत विषयांचा क्रम ठरवण्याचा अधिकार पीठासन अधिकाऱ्यांचा असल्याचे सांगितले. कुठलाही विषय टाळणार नाही; पण आचारसंहिता लागू होण्याच्या पर्शवभूमीवर सत्ताधारी गटाने व पालिका प्रशासनाने सुचवलेले विषय मंजूर करू या. त्यानंतर पहिला विषय घेऊ या, अशी भूमिका कऱ्हाडकरांनी घेतली. मात्र, विनोद बिरामणे यांचा पारा चढला. मागील विषय वाचून कायम केल्याशिवाय व इतिवृत्त वाचल्याशिवाय पुढचा विषय घ्यायचा नाही. थेट महिला नगराध्यक्ष आहे, म्हणून दादागिरी चालणार नाही, असे ते म्हणाले. नारायण बिरामणे, वन्ने व कासुर्डे यांनी त्यांची री ओढली. विनोद बिरामणे यांनी जोराने बोलत, चुटक्‍या वाजवत, हातवारे करत,टेबलवर हात आपटून राग व्यक्‍त केला.

त्याच वेळी नगराध्यक्षांनी बिरामणे यांनी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांकडे त्यांनी माफी मागावी अन्यथा सभागृहातून बाहेर जावे, असा आदेश नगराध्यक्षांनी दिला. त्याला बिरामने यांच्या सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला. माफी मागणार नाही, असा हट्ट बिरामने यांनी धरला. मात्र, पोलिसांनी त्यांना बाहेर काढावे, असे कऱ्हाडकरांनी सांगितले. पोलीस सभागृहात आल्यावर महिला सदस्य आक्रमक झाल्या. कोण हात लावतंय, ते बघूच, अशी भाषा त्यांनी वापरली. त्यामुळे गोंधळ आणखी वाढला.

बिरामणे यांना सभागृहातून बाहेर काढल्याशिवाय सभा होणार नाही, असा पवित्रा नगराध्यक्षांनी घेतला. त्यावेळी पोलिसांची आणखी कुमक दाखल झाली. शेवटी विनोद बिरामणे यांनी सहकाऱ्यांचा विरोध डावलून माफी न मागता सभात्याग केला. त्यानंतर सभा सुरू झाल्यावरही त्याच मुद्‌द्‌यांवर वाद सुरूच राहिला. विजय कांबळे यांनी नगराध्यक्षांवर हल्ला चढवल्याने त्या संतापल्या. अपशब्द वापरल्याबद्दल कांबळे यांनी पाच मिनिटात माफी मागावी अन्यथा त्यांनीही बाहेर जावे, असा आदेश कऱ्हाडकरांनी दिला. त्यावर सत्ताधारी गट कमालीचा आक्रमक झाला. विठ्ठल बगाडे यांनी विजय कांबळेंची बाजू घेतली. कऱ्हाडकर यांनी बगाडे यांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखल्याने कांबळे यांच्या माफीनाम्याचा विषय थांबला.

त्यानंतर चहापान घेण्यात आले. त्यावेळी मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दोन्ही गटांची समजूत काढून पुन्हा सभेला सुरुवात केली. पहिला विषय घेतल्याशिवाय सभा संपणार नाही, अशी हमी कऱ्हाडकरांनी दिल्यावर उर्वरित विषय बहुमताने मंजूर करण्यात आले. कर वाढीसंदर्भाच्या विषयात दोन्ही गटांनी शहरवासीयांची बाजू घेतली. शेवटच्या टप्प्यात मागील इतिवृत्त कायम करण्यावरून खडाजंगी झाली. अखेर लेखी सूचना व उपसूचना मांडण्यात आल्या. आयत्या वेळचे विषय नगराध्यक्षांनी फेटाळले. ही सभा तब्बल सहा तास सुरू होती.

Leave A Reply

Your email address will not be published.