रिपाइंलाही मुख्यमंत्रीपद द्या – केंद्रीय मंत्री आठवले

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी युतीत मित्र पक्षांना 18 जागा सोडणार असल्याचे नेत्यांनी जाहीर केले आहे. विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 10 जागा सोडाव्यात,’ अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. विधानसभा निवडणूक कमळ चिन्हावर नाही, तर आमच्या स्वतःच्या चिन्हावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नवीन विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, आदी उपस्थित होते.

“व्हीजेएनटीला स्वतंत्र आरक्षण देण्याचा विचार सुरू आहे. धनगर समाजाला न्याय देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. माझ्या मंत्रालयाचे बजेट 76 हजार कोटीचे आहे. भीमा कोरेगाव स्मारकाला आणखी भव्य करण्याचा प्रस्ताव आहे,’ असेही आठवले यांनी नमूद केले.

युतीबाबत बोलताना आठवले म्हणाले, “शिवसेना-भाजपने युती टिकवून ठेवली पाहिजे. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. आम्हाला पश्‍चिम महाराष्ट्रात तीन जागा व पुण्यात किमान एक जागा मिळाली पाहिजे. मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांनी सामंजस्याने घ्यावे. अडीच-अडीच वर्षावर चर्चा होत असल्यास युतीने भाजप आणि शिवसेनेला दोन-दोन वर्षे व रिपब्लिकन पक्षाला एक वर्ष मुख्यमंत्रीपद द्यावे.’

Leave A Reply

Your email address will not be published.