दुष्काळी परिस्थितीत नागरिकांना दिलासा द्या

विभागीय आयुक्‍तांच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना


टंचाई निवारणार्थ जिल्हानिहाय घेतला आढावा

पुणे – परतीचा पाऊस समाधानकारक न झाल्याने पुणे विभागात पाणी टंचाईचे तीव्र संकट निर्माण झाले आहे. या टंचाई निवारणार्थ तातडीच्या उपाययोजना राबवून सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागातील टंचाई आढावा बैठक पार पडली. यावेळी डॉ. म्हैसेकर यांनी प्रत्येक जिल्हानिहाय टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला, त्यानंतर ते बोलत होते. यावेळी साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, साताऱ्याचे कैलास शिंदे, कोल्हापूरचे अमन मित्तल, उपायुक्त प्रताप जाधव, संजयसिंह चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पावसाच्या कमतरतेमुळे यावर्षी पाण्याची मोठी समस्या आहे. या कालावधीत पुणे विभागातील 677 गावे व 4 हजार 258 वाड्यावस्त्यांवरील 12 लाख 38 हजार 250 लोक बाधीत झाले आहेत. तर 3 लाख 72 हजार 844 पशुधन बाधीत आहे. ही संख्या खूपच मोठी असून 43 शासकीय व 761 खजगी अशा मिळून 804 टॅंकर्सच्या माध्यमातून पुणे विभागात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 211 गावे तर 1410 वाड्या वस्त्या बाधीत आहेत. तर सातारा जिल्ह्यात 3 लाख 18 हजार 658 आणि सांगली जिल्ह्यातील 54 हजार 186 पशुधन बाधित आहे.

पुण्यातही विविध उपाय
पुणे विभागात टंचाईचा सामना करण्यासाठी नवीन विंधन विहिरी घेणे, नळपाणी योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, नगरपालिका हद्दीतील प्रगतीपथावरील योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, तात्पुरत्या पुरक नळपाणी पुरवठा योजना करणे, विहिरी खोल करणे, त्यांच्यातील गाळ काढणे या उपायोजना करण्यात येत आहेत. टंचाईचा सामना करण्यासाठी या कामांना वेग देणे आवश्‍यक आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना, आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी विशेष उपायोजना करण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)