नारायणगाव, (वार्ताहर)- येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करुन नारायणगाव पोलीस स्टेशनला वाढीव कर्मचारी देण्याची मागणी आमदार अतुल बेनके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार अतुल बेनके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नारायणगाव व वारुळवाडी गावची एक लाखाहून अधिक लोकसंख्या असून लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव प्रमुख बाजारपेठ असून पुणे-नाशिक रस्त्यावरील नारायणगावातुन पुणे व नाशिककडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते.
तसेच वारुळवाडी (ता. जुन्नर) येथे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, शाळा, महाविद्यालय, नारायणगाव एसटी बस स्थानक असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवासी, विद्यार्थी, दुचाकी, चार चाकी व मालवाहू गाड्यांची गर्दी असते.
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव बाजार उपकेंद्रात मालाची विक्री करण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने येत असतात. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव मध्यवर्ती ठिकाण असल्याने एसटी बस स्थानक परिसरात कायम वाहतूक कोंडी होत असते.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने प्रयत्न केले जातात; परंतु नारायणगाव पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचार्यांची संख्या पुरेशा प्रमाणात नसल्याने त्याचा परिणाम वाहतुक कोंडीवर दिसून येतो.
वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी नारायणगाव पोलीस स्टेशनला वाढीव पोलिस कर्मचारी देणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांना आदेश द्यावेत अशी मागणी आमदार अतुल बेनके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.