कमला नेहरू रुग्णालयाला ‘ऑक्‍सिजन द्या’

अद्ययावत यंत्रणा पूर्ववत करण्याची सुराज्य संघर्ष समितीची मागणी

पुणे – कमला नेहरू रुग्णालयातील ऑक्‍सिजन पुरवठा सुविधा पूर्ववत करून करोना रुग्णांवरील उपचारासाठी ते उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुराज्य संघर्ष समितीने आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

करोनाच्या प्रसारामुळे महापालिका खासगी रुग्णालये सुद्धा ताब्यात घेत आहे. त्याचप्रमाणे आता महापालिकेच्या रुग्णालयामध्ये मध्यवर्ती ऑक्‍सिजन पुरवठा केंद्र सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, आपल्याच रुग्णालयातील करोनाच्या रुग्णांवर उपचाराचा दृष्टीने अत्यंत उपयोगी अशी सुविधा बंद झाली, का झाली याचा विचार मात्र महापालिका करीत नाही, असा आरोप समितीचे विजय कुंभार यांनी केला आहे.

महापालिकेच्या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये 2010मध्ये सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती ऑक्‍सिजन सुविधा तयार करण्यात आली. तत्कालीन स्वाइन फ्लूच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या आपत्तीला तोंड देण्यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली होती. या सुविधेतून रुग्णालयातील 17 वॉर्डसमधील सुमारे 350 बेडसना पाइपलाइनद्वारे ऑक्‍सिजन पुरवण्यात येणार होता.

अतिशय मोठ्या क्षमतेचे ऑक्‍सिजन कोठार या सुविधेद्वारे निर्माण करण्यात आले होते. किमान 7 ते 15 दिवस सलग ऑक्‍सिजन पुरवण्याची क्षमता या यंत्रणेत होती. सध्या ही सुविधा खासगी संस्थांच्या सहभागाने सुरू असलेल्या फक्त दोन युनिटपुरती सुरू असल्याचे सांगितले जाते. इतर वॉर्डमधील बेड्‌ससाठी असली सुविधा पूर्ण बंद आहे.

संपूर्ण यंत्रणा एकूण 750 बेडसाठी उपयोगात येणार होती. सदर सुविधा सुरू असती तर करोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळातच अत्यंत उपयोगी ठरू शकली असती, असा दावा कुंभार यांनी केला आहे. ही सुविधा का बंद पडली? कुणी बंद पाडली? वाया गेलेल्या पैशांची रुग्णांच्या होत असलेल्या हालअपेष्टांची जबाबदारी कोणाची? कमला नेहरू रुग्णालय हे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल साधे प्रसुतीगृह कसे झाले आणि कुणी केले? असे सवालही कुंभार यांनी उपस्थित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.