पुणे – राज्यातील 12 वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या जागेचा मालकी हक्क हस्तांतरित करावा, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाने केली आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी संघातर्फे विशेष मोहीम राबवली जात असून, त्याअंतर्गत नागरिकांना “डीम्ड कन्व्हेयन्स’बाबत मार्गदर्शन केले जात आहे.
याबाबत माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन म्हणाले, “महाराष्ट्र ओनरशिप ऑप फ्लॅट ऍक्ट -1963 (मोफा) कायद्यानुसार, सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे मालकी हक्क हस्तांतरणाची प्रक्रिया ही बांधकाम व्यावसायिकाने करणे बंधनकारक आहे. मात्र, आजही राज्यातील 25 ते 30 टक्के सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मालकी हक्क हस्तांतरित झालेले नाहीत.
बहुतांश वेळा नागरिकांमध्ये याबाबत माहितीचा अभाव तसेच अन्य समस्यांचा सामना करावा लागतो. नागरिकांमध्ये याविषयाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी महासंघाने हे जनजागृती अभियान हाती घेतले असून, शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन नागरिकांना डीम्ड कन्वेयन्स या विषयाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते.
गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही राज्यातील 12 वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्या जागेचा मालकी हक्क हस्तांतरित करावा, अशी मागणी करत आहोत. या मागणीला अधिक व्यापक स्वरूपात पुन्हा मांडण्यासाठी आम्ही व्यापक प्रयत्न करणार आहोत.’