मंचर – आंबेगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांना बदल हवा म्हणून माझ्या पदयात्रा, सभांना गर्दी वाढत आहे. केंद्रात असलेले भाजप-शिवसेना सरकार आणि राज्यातही पुन्हा शिवसेना-भाजप सरकार येणार असल्याने विकासकामांना निधी मोठा उपलब्ध होण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी, असे आवाहन राजाराम बाणखेले यांनी केले.
आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजाराम बाणखेले यांच्या प्रचारार्थ मंचर येथे सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उद्योजक अक्षय आढळराव पाटील, माजी जिल्हाप्रमुख ऍड. अविनाश रहाणे, सहसंपर्क प्रमुख सुरेश भोर, भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय थोरात, सहसंपर्क प्रमुख जयसिंग एरंडे, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, शिवसेनेचे गटनेते देविदास दरेकर, सुनील बाणखेले, डॉ. ताराचंद कराळे, कैलास राजगुरव, रवींद्र त्रिवेदी, सागर काजळे, सचिन बांगर, कल्पेश बाणखेले यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा बोलबाला झाला; परंतु प्रत्यक्षात कामे झाली नाहीत. गेल्या तीस वर्षांत विकासकामांच्या नावाखाली फसवणूक झाली.
एकहाती सत्ता आल्याने मतदारांचे महत्त्व कमी झाले. एकदा आमदार करण्यासाठी तुमचे मत अनमोल द्या, असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि पक्षाच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सूत्रसंचालन रवीद्र करंजखेले यांनी तर प्रास्ताविक संतोष बाणखेले यांनी केले.