दहा दिवस मला द्या, पाच वर्षे तुम्हाला देतो : राम शिंदे  

जामखेड – तालुक्‍यात विकासकामे करताना कोणाला कधीच नाराज केला नाही. त्यामुळे येणारे दहा दिवस मला द्या, पुढील पाच वर्षे मी तुमचा म्हणून दोन्ही तालुक्‍यांचा विकास करेल, अशी भावनिक साद पालकमंत्री राम शिंदे यांनी घातली.

जामखेड तालुक्‍यातील सोसायटी अध्यक्ष, सचिवांच्या बैठकीत ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार शिंदे यांच्या प्रचारार्थ जगन्नाथ राळेभात यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुक्‍यातील सोसायटी अध्यक्ष, सचिव, संचालकांची बैठक घेण्यात आली. राळेभात अध्यक्षस्थानी होते.

बाजार समितीचे सभापती गौतम उतेकर, माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भगवान मुरूमकर, नगराध्यक्ष निखिल घायतडक, मनोज राजगुरू, संचालक सुधीर राळेभात, मकरंद काशीद, करण ढवळे, सुभाष जायभाय, बाजीराव भोंडवे, पृथ्वीराज वाळुंजकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेभात, पांडुरंग सोले, विठ्ठलराव राऊत, बाळासाहेब शिंदे उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, तालुक्‍यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आपल्या ताब्यात आहे, तर सोसायटी जगन्नाथ राळेभात यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. विरोधकांना दोन्ही तालुक्‍यांत उमेदवार मिळाला नाही, म्हणून बाहेरून आयात करावा लागला. मागील पन्नास वर्षांत जेवढा विकास झाला नाही, तेवढा पाच वर्षांत केला, असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.