बीड – मागील काही दिवसांपासून राज्यभरात विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे आरोप होतायत. तर विरोधी पक्षातील नेत्यांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप होतायत. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्यावर देखील देवस्थानाची जमीन हाडपल्याचा आरोप झाला आहे. त्यावर सुरेश धस यांनी सत्ताधारी नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं आहे.
एक हजार कोटींच्या देवस्थानाच्या जमीन घोटाळ्याच्या आरोप सुरेश धस यांच्यावर करण्यात आला आहे. यावर त्यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका, असा सज्जड दम त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.
आमदार धस म्हणाले की, 1 हजार कोटींचा आरोप करणाऱ्यांना माझ्याकडील, माझी वडिलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त 50 कोटी द्या. मी जिल्हा सोडतो, असं आव्हान सुरेश धस यांनी तक्रारदारांना केलं आहे. खोटे आरोप करून बदनाम करु नका, असे देखील सुरेश धस म्हणाले आहेत.
सध्या अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहे. या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी नेतेमंडळी आघाडीवर आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुरेश धस यांनी आपल्यावरील आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं.