पुणे/जुन्नर- बौद्धकालीन लेण्यांचा देशातील सर्वांत मोठा गट असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील लेणी समूहाच्या पर्यटनदृष्ट्या विकासासह शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांच्याकडे केली आहे. या मागणीबरोबरच शिवनेरी, सातवाहनकालीन नाणेघाट आणि लेणी समूहाच्या पाहणीसाठी जुन्नरला येण्याचे आमंत्रण देखील मंत्री पटेल यांना दिले आहे.
या परिसरातील लेणीसमूह आणि नाणेघाट हा केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असल्याने, या परिसराच्या विकासासाठी केंद्र सरकारने विकास आराखडा बनवावा यासाठी प्रयत्नशील असून, त्या दृष्टीने खासदार बापट यांनी केंद्रीय मंत्री पटेल यांची भेट घेऊन पत्र दिले. यावेळी पुणे शहर भाजपचे चिटणीस सुनील माने उपस्थित होते. गिरीश बापट म्हणाले की, केवळ पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण देशात ही लेणी सर्वांत मोठी असल्याने देशाचा विषय म्हणून याकडे पाहण्यात गरज होती.
बौद्ध धर्माला मोठी परंपरा असल्याने निधी उपलब्ध करून लेण्यांचा विकास केल्यास बौद्ध धर्माच्या अभ्यासकांसाठी याची उपयुक्तता वाढेल. पण अद्याप याकडे कोणी लक्ष न दिल्याने सुनील माने यांनी डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि प्रख्यात पुरतत्त्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्याशी याबाबत झालेल्या चर्चेनंतर या विषयावर काम करण्याचा निर्णय घेतला.
त्याबाबत खासदार गिरीश बापट यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी केंद्र सरकारकडे या विभागाची जबाबदारी असल्याने केंद्र सरकारच्या माध्यमातून याकडे लक्ष देण्यासाठी प्रयत्न करण्याचे सुचवले. त्याप्रमाणे त्यांनी सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांना देशाचा प्रकल्प म्हणून हातात घेण्याचा विनंती केली.
डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आराखडा बनवावा
डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जुन्नरच्या सातवाहनकाली पर्यटन विकासाचा आराखडा केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने बनवावा. डॉ. शिंदे हे गांधीनगर येथील राष्ट्रीय सागरी हेरिटेज कॉम्पेक्सचे महासंचालक असताना, त्यांनी या परिसराच्या विकासाचा सुमारे दोन हजार कोटींचा विकास आराखडा बनविला आहे. त्या धर्तीवर जुन्नरचा विकास आराखडा बनविण्यात यावा, अशी देखील मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
शिवनेरी किल्ल्यासाठी विशेष निधी द्यावा
छत्रपती श्री शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत असून, त्यांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला आमचा ऊर्जास्रोत आहे. या किल्ल्याच्या विकासासाठी देखील निधीची मागणी केली असून किल्ल्यावरील अंबरखाना इमारतीमधील प्रस्तावित सातवाहनकालीन वारसा संग्रहालयासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. या मागणीचे पत्र देखील दिल्याचे बापट यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात सातवाहनकालीन जुन्नर
जुन्नरला अडीच हजार वर्षांचा सातवाहनकालीन वारसा
सातवाहनकालीन
व्यापारी केंद्र नाणेघाट
गटात विभागलेला सुमारे 250 लेणीसमुहांचा समावेश
छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी किल्ला
अष्टविनायकांपैकी लेण्याद्री आणि ओझर देवस्थान लेण्यांचे