माळेगावातील जळितग्रस्तांना घरे द्या

फासेपारधी आघाडीचे बारामतीत आंदोलन

बारामती- फासेपारधी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात बारामतीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) संलग्न पारधी समाज आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन देण्यात आले. माळेगाव येथे जळालेली घरे शासकीय निधीतून उभारून द्यावीत, या समाजबांधवांवर दाखल झालेले खोटे गुन्हे काढून टाकावेत, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व शालेय साहित्य मोफत मिळावे, आदी मागण्या केल्या आहेत.

 

राज्य शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही फासेपारधी समाजाच्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात फासेपारधी समाजाला गावनिहाय शासकीय किंवा गावठाणात घरकुल बांधून द्यावेत, कसण्यासाठी गायरान किंवा शासकीय जमीन द्यावी, या समाजाला मोफत अन्नधान्य मिळावे, शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल तर ते कायम करून त्यांना शासकीय योजनेतून घरकुल उभारुन द्यावे, सोनकसवाडी येथील भूदानाची जमीन फासेपारधी समाजाला विभागून द्यावी, शासकीय योजनांचा लाभ व विनातारण कर्ज मिळावे, वयोवृद्धांना श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ द्यावा, या समाजासाठी समाज मंदिरांची उभारणी व्हावी, निवेदनावर पुणे जिल्हा पारधी समाज आघाडीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार व पुणे जिल्हा रिपाईचे उपाध्यक्ष विष्णू भोसले यांच्या सह्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.