वॉशिंग्टन – जगभरातील हजारो नर्सेस आणि डॉक्टरांना अमेरिकेत कायम स्वरूपी वास्तव्यासाठी त्वरित ग्रीन कार्डे देण्याची व्यवस्था करा अशी सूचना अनेक अमेरिकन कॉंग्रेस सदस्यांनी केली असून त्यांनी तसा प्रस्तावही अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात सादर केला आहे.
करोनामुळे अमेरिकेतील सुमारे तेरा लाख लोक बाधित झाले असून 70 हजारांहून अधिक लोकांना तेथे आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे तेथील आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण आला आहे. लक्षावधी करोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेतील वैद्यकीय मनुष्यबळ कमी पडते आहे. त्यामुळे अमेरिकत हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. या लोकांना ग्रीन कार्ड देण्याची उपाययोजना केली तरच हे लोक मोठ्या प्रमाणात अमेरिकेत येऊ शकतील असे या संसद सदस्यांचे म्हणणे आहे.
सध्याच्या करोनाच्या काळात निदान 25 हजार नर्सेस आणि किमान 15 हजार डॉक्टरांना ग्रीन कार्ड देण्याचा इरादा या संसद सदस्यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या सरकारने असा निर्णय घेतला तर भारतीय नर्सेस आणि डॉक्टरांना त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होऊ शकतो. सध्या एच -1बी आणि जे2 व्हिसावर अनेक भारतीय नर्सेस आणि डॉक्टर्स अमेरिकेत वास्तव्याला आहेत.