संबंधित अधिकाऱ्यांची घेतली बैठक
नगर: श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी पाटबंधारे विभाग यांनी कुकडी प्रकल्पासाठी चांदगाव, शेडगाव, टाकळी लोणार या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केलेल्या आहेत. त्याबदल्यात शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला आज अखेरपर्यंत देण्यात आला नसून तो मोबदला लवकरात लवकर द्यावा त्यासंदर्भात आमदार राहुल जगताप यांनी भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी किसवे, भूमी अभिलेखचे उपाधीक्षक भांदुर्गेसह कुकडी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार जगताप यांची मंगळवारी भेट घेऊन अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्यावर आमदार जगताप यांनी संबंधित विभागाची बुधवारी (दि.12) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील किसवे यांच्या दालनात एकत्रीत बैठक बोलावून घेतली. फाईल प्रलंबित राहण्याची कारणे शोधून त्यावर चर्चा करण्यात आली. अधिकाऱ्यांनी फाईल मधील पूर्तता पूर्ण करण्यासाठी मर्यादित कालावधी ठरवून देण्यात आला. संबंधित शेतकऱ्यांना लवकर मोबदला मिळवून देण्यासाठी जगताप यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक बोस, माजी नगरसेवक अख्तर शेख, बापूसाहेब वाळूंज, कांतीलाल म्हस्के, संतोष सोनवणे, शशिकांत जगताप, पप्पू म्हस्के, भिमराव म्हस्के, कालिदास जगताप, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.