डेहणे येथील प्रचारार्थ आयोजित सभेत दिलीप मेदगे यांचे आवाहन
डेहणे- खेडच्या पश्चिम भागातील जनतेला माणुसकीची सत्ता पाहिजे म्हणून यावेळी अतुल देशमुख हा एकमेव योग्य उमेदवार असून त्यांना संधी द्या, असे आवाहन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे यांनी केले.
डेहणे (ता. खेड) येथे अपक्ष उमेदवार अतुल देशमुख यांच्या प्रचारार्थ बुधवारी (दि. 9) आयोजित केलेल्या सभेत मेदगे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार अतुल देशमुख, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, कैलास गाळव, पंचायत समिती सदस्य चांगदेव शिवेकर, नगरसेविका रेखा क्षोत्रीय, शंकर कोरडे, काळुराम सातकर, बाजार समिती संचालक बाळासाहेब शिंदे, सचिन लांडगे आदी मान्यवर यांच्यासह विविध गावाचे सरपंच उपसरपंच पश्चिम भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिलीप मेदगे म्हणाले की, दहशतीसाठी किंवा व्यापारासाठी नको तर माणुसकी जपण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्यासाठी सत्ता हवी आहे. आदिवासी पश्चिम भागातील अनेक प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे माजी-आजी आमदारांनी दुर्लक्ष केले. आपल्या भागातील विकास साधण्यासाठी आपल्या भागातील नेतृत्वाला संधी मिळाली आहे. या संधीचे सोने करा. यावेळी मेदगे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते व शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे यांनी पश्चिम भागाला विकासापासून डावल्याबाबत निशाणा साधला. शरद बुट्टे पाटील म्हणाले की, पश्चिम भागातील व्यक्तीला अडचणी निर्माण झाल्यावर मदतीला धावून जाणारा तालुक्यात अतुल देशमुख सारखा एकमेव पाठीराखा आहे. त्यांच्या माध्यमातून या भागाला तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. गेली 15 वर्षे या परिसरात विशेष किंवा ठळक विकास काम नाही. ही वापरून कामे पूर्ण करण्यासाठी देशमुख यांना संधी दिल्यास पश्चिम भागाचा विकास केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
- नायफड-वाशेरे गटाचे प्रतिनिधित्व करताना आपण जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. यापुढे सर्वांगीण विकासासाठी माझी उमेदवारी आहे. या भागातील रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडविणार असून आदिवासी भागातील विविध जंगलसंपत्तीचे रक्षण आणि त्यापासून रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच करवंदे, जांभळे आवळे याच्यावर प्रक्रिया करणारे लघु उद्योगांना प्राधान्य दिले जाईल जेणेकरून आदिवासी व त्याभागातील नागरिक स्वावलंबी बनेल. चास कमान धरणाच्या बुडीत क्षेत्रात बंधारे बांधून पाण्याचा ज्वलंत प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात येईल.
– अतुल देशमुख, अपक्ष उमेदवार, खेड-आळंदी विधानसभा