अशोक पवार यांना मंत्रिपद द्या

पिंपळे जगताप ग्रामस्थांकडून शरद पवारांना पत्र

केंदूर-शिरूर – हवेली मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी पिंपळे जगताप ग्रामस्थांसह शिरूर तालुक्‍यातील अनेक युवकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अशोक पवार यांचे समर्थक आणि पिंपळे जगताप येथील युवा उद्योजक श्रीपाद जगताप यांनी थेट शरद पवार यांना पत्र लिहून अशोक पवार यांना मंत्रिपद मिळावे यासाठी साकडे घातले आहे.

अशोक पवार यांनी भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचा तब्बल एक्केचाळीस हजार मतांनी पराभव केला यापूर्वी 2009 ते 2014 या काळात अशोक पवार आमदार असताना त्यांनी मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकला होता पवारांच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत. उच्च शिक्षित व कल्पक अभ्यासू आमदार म्हणून पवार यांची ओळख आहे. दरम्यान त्या कार्यकाळात सरकारने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत अशोक पवार यांचा वाटा असल्याचे बोलले जाते. गेल्या तीस वर्षांपासून तालुक्‍याला मंत्रिपद मिळाले नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

त्यामुळे अशा हुशार आणि उच्च शिक्षित आमदाराच्या माध्यमातून तालुक्‍याला मंत्रिपद मिळावे, अशी पिंपळे जगतापचे ग्रामस्थ इच्छा व्यक्त करत आहेत. दरम्यान अशोक पवार यांना मंत्रिपदाची संधी मिळावी म्हणून गावातील राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते आणि युवा उद्योजक श्रीपाद जगताप यांनी ग्रामस्थांच्या वतीने थेट शरद पवार यांना पत्र लिहून अशोक पवार यांना मंत्रीपदी संधी देण्याची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.