“रस्ता द्या, नाहीतर मतदान नाही’

बाणेर पाषाण लिंक रोड रस्त्यासाठी नागरिकांचे आंदोलन

औंध – बाणेर पाषाण लिंक रोडवरील 120 फुटी रस्ता व अन्य समस्यांबाबत बाणेर पाषाण लिंक रोड विकास समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. “रास्ता द्या. नाही, तर मतदान नाही’ अशा निदर्शनाचे असे फलक दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला.

या परिसरातील सुमारे 50 सोसायट्यांमधील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. यावेळी पाषाण बाणेर लिंकरोड रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा निषेधाचे फलक घेऊन नागरिकांनी निषेध व्यक्त केला. 30 वर्षे या भागातील रस्त्याचे काम प्रलंबित आहे. हा रस्ता अद्याप सुरू झालेला नाही. याबाबत अनेक निवेदने देऊनही कारवाई झालेली नाही.

सध्या बाणेर पाषण परिसराला जोडण्यासाठी 40 फूट रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. ज्येष्ठ नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडने अडचणीचे जात आहे. या परिसरामध्ये वाहतुकीचा प्रश्‍न वारंवार निर्माण होतो. अनेक वेळा अपघात देखील झाले आहेत.

बाणेर पाषाण लिंक रस्त्याची काही जागा अजूनही पालिकेने ताब्यात घेतले नाही. बाणेर पाषाण लिंक रोड विकास समितीच्या वतीने अनेक वेळा मागणी करण्यात आलेली आहे. परंतु, पालिकेने याची अद्याप दखल घेतलेली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ता पूर्ण झालेला नाही. पालिका प्रशासनाला या संदर्भामध्ये वेळो-वेळी निवेदन देण्यात आली आहे.

यावेळी आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका स्वप्नाली सायकर यांनी निदर्शनकर्त्यांची भेट घेतली. यावेळी विकास समितीचे राजेंद्र चित्तुर, रविंद्र सिन्हा, गणेश तिखे, नरेंद्र शर्मा, मनीष मिश्रा, किशोर महाजन, वैशाली पाटकर, राहुल कोकाटे, प्रल्हाद सायकर, गणेश कळमकर, अभियंता दिनकर गोंजारी, श्रीहरी येवलेकर, अजित सुर्वे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या रस्ताचा प्रश्‍न आमचे नगरसेवक पदाधिकारी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही थोड्या जागा ताब्यात घेण्याचे राहिले आहे. त्यावर बैठकही सुरू आहे. सामंजस्याने कामे पूर्ण केली जातील. लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– मेधा कुलकर्णी, आमदार.

बाणेर पाषाण लिंक रोड परिसरातील समस्या गेले अनेक वर्षांपासून “जैसे थे’, अशाच परिस्थितीत आहेत. पालिकेला निवेदने देऊन देखील पालिका दुर्लक्ष करीत आहे. बाणेर पाषाण लिंक रोड 120 फूट रस्त्याचा प्रश्‍न मार्गी न लागल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे.
– राजेंद्र चित्तुर, अध्यक्ष, बाणेर पाषाण लिंक रोड विकास समिती.

Leave A Reply

Your email address will not be published.