पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मागणी
पिंपरी (प्रतिनिधी): पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते योगेश बहल यांना विधानपरिषदेसाठी संधी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी नगरसेवकांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी केली आहे. पाटील यांना यासंदर्भात माजी महापौर हनुमंत भोसले यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, योगेश बहल हे महापालिकेतील सर्वात ज्येष्ठ तसेच अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक मानाची पदे भूषविली असून विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना अनेक नेते पक्षाला सोडून गेले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठ्या उमेदीने पक्षाला उभारी दिली आणि सत्ता स्थापन केली. त्यावेळी पिंपरी विधानसभा मतदार संघाची सर्व जबाबदारी योगेश बहल यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळल्यामुळे अण्णा बनसोडे निवडून आले.
योगेश बहल हे सलग सहाव्यांदा नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण शहरात निष्ठावान व पक्षाशी प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. पिंपरी चिंचवड शहरात विविध जाती -धर्माचे लोक राहतात. योगेश बहल हे अल्पसंख्याक पंजाबी समाजाचे असल्याने त्यांना विधानपरिषदेसाठी संधी दिल्याचा संदेश समाजामध्ये जाईल.
आगामी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत आ. अण्णा बनसोडे यांच्यासोबत बहल यांच्यारूपाने आणखी एक आमदार राहिल्यास राष्ट्रवादी पक्षाला फायदाच होईल. तरी येत्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून योगेश बहल यांचा विचार करावा, अशी मागणी या निवेदनात माजी महापौर हनुमंत भोसले यांनी केली आहे.
या निवेदनावर भोसले यांच्यासह ज्येष्ठ नेते हनुमंतराव गावडे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी महापौर आर.एस. कुमार, अनिता फरांदे, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, प्रकाश रेवाळे, माजी उपमहापौर मुरलीधर ढगे यांच्यासह राजाराम कापसे, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, डब्बू आसवानी, राहुल भोसले, अतुल शितोळे, राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, मोहम्मदभाई पानसरे आदी आजी-माजी पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.