गीते, सुळे, राणे, विखे, बापट यांची प्रतिष्ठा पणाला

लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी 14 मतदारसंघात आज मतदान
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारांच्या समर्थनार्थ राजकीय पक्षांच्या प्रचारसभा, आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा शांत झाल्यानंतर 14 मतदारसंघात उद्या, मंगळवारी मतदान होत आहे. या मतदारसंघातून 249 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंदिस्त होणार असून केंद्रीय मंत्री अनंत गिते, खासदार चंद्रकांत खैरे, सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, राजू शेट्टी, माजी खासदार निलेश राणे, सुनील तटकरे यांच्यासह पहिल्यांदाच लोकसभेच्या मैदानात उतरलेले गिरीष बापट, डॉ. सुजय विखे-पाटील, नरेंद्र पाटील या नवख्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मराठवाडा आणि कोकणातील प्रत्येकी दोन, उत्तर महाराष्ट्रातील तीन तर पश्‍चिम महाराष्ट्रतील सात अशा एकूण 14 लोकसभा मतदारसंघात 23 एप्रिल रोजी मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात राजकारणात दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आई, वडिल आणि सासरे अशा नात्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या लक्ष्य तिसऱ्या टप्प्यातील लढतींकडे लागले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे या बारामतीमधून लोकसभेतील विजयाची हॅंट्रीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपले चिरंजीव डॉं. सुजयसाठी राजकीय कारकिर्द पणाला लावली आहे. सुजय विखे हे अहमदनगरमधून भाजपच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्गात आपले चिरंजीव नीलेशसाठी ठाण मांडून बसले आहेत. तळ कोकणातील आपले वर्चस्व टिकविण्यासाठी राणेंनी निवडणुकीत सर्वस्व पणाला लावले आहे. भाजपमध्ये उपेक्षा सहन करणारे उत्तर महाराष्ट्रातील नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांची स्नुषा रक्षा खडसे या रावेरमधून निवडणूक लढवत आहेत. तर, राष्ट्रवादीच्या माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी विद्यमान खासदार राजू शेट्टी यांना हातकणंगलेत आव्हान दिले आहे. त्यामुळे येथील लढतील लक्षवेधी बनल्या आहेत.

या टप्प्यात 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदार मतदानाचा पवित्र हक्क बजावणार आहेत. यामध्ये 1 कोटी 33 लाख 19 हजार 10 पुरुष तर 1 कोटी 24 लाख 70 हजार 76 महिला आणि 652 इतर नागरिक मतदान करणार आहेत. तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे. तिसऱ्या टप्प्यात 249 उमेदवारांमध्ये 19 महिला उमेदवार असून बारामती मतदार संघात सर्वाधिक चार महिला उमेदवार आहेत. तर पुणे व माढा मतदारसंघात सर्वाधिक प्रत्येकी 31 उमेदवार असून सर्वात कमी 09 उमेदवार हे सातारा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे आहेत. याशिवाय जळगाव (14), रावेर (12), जालना (20), औरंगाबाद (23), रायगड (16), बारामती (18),अहमदनगर (19), सांगली (12),रत्नागिरी-सिंधुदुर्ग (12), कोल्हापूर (15) व हातकणंगले (17) उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

येथे होणार आज मतदान
जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.