न्यूयॉर्क – एकीकडे जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह दिसले यांची निवड झालेली असताना, दुसरीकडे “टाइम’ या अमेरिकेतील प्रख्यात नियतकालिकाने “वर्षातील सर्वोत्कृष्ट बालक’ (किड ऑफ द इअर) या पुरस्कारासाठी भारतीय वंशाच्या गीतांजली रावची निवड केली आहे. गीतांजली 15 वर्षांची युवा संशोधक असून, तिने दूषित पेयजल व गांजाचे व्यसन तसेच सायबर खोडसाळपणा यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधले आहेत. टाइमने पाच हजार उमेदवारांतून राव हिची निवड केली असून तिची मुलाखत अभिनेत्री अँजेलिना जोली हिने घेतली आहे. तिचे छायाचित्रही “टाइम’च्या ताज्या अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित करण्यात आले आहे. हाही एक जागतिक सन्मानच मानला जातो.
एकूण पाच हजार युवा शास्त्रज्ञांची सखोल चाचणी घेतल्यानंतर हा पुरस्कार जाहीर करताना “टाइम’ने म्हटले आहे की, हे जग ज्यांनी त्याला आकार दिला त्यांचे आहे. जग अनिश्चिततेकडे जात असताना नव्या पिढीतील मुले संशोधनातून जी उत्तरे शोधत आहेत ती महत्त्वाची आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
निरीक्षण, संशोधन, संदेशवहन, विचार-चर्चा यातून आपण काही समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असे गीतांजलीने व्हर्च्युअल मुलाखतीत सांगितले. दूषित पाण्यापासून अनेक समस्यांवर तिने अभिनव उत्तरे शोधली आहेत. प्रत्येक प्रश्नावर एकाच वेळी विचार करण्यापेक्षा एका प्रश्नावर लक्ष केंद्रित करून काम करा. जर मी हे करू शकते तर तुम्हीही करू शकाल. कधी न पाहिलेल्या समस्या आमच्या नवीन पिढीपुढे आहेत. काही जुन्या समस्याही अजून आहेत. कोरोनाची साथ ही एक महत्वाची समस्या आहे. मानवी हक्कांचे विषय आहेत. काही प्रश्न आपण तयार केलेले नाहीत, पण ते सोडवावे लागतील. त्यात सायबर गुन्हेगारी, हवामान बदल यांचा समावेश आहे. हे प्रश्न तंत्रज्ञानामुळे निर्माण झाले आहेत, असे तिने स्पष्ट केले.