नित्यानंदच्या संस्थेतून मुलींच्या सुटकेसाठी पालक न्यायालयात

अहमदाबाद : स्वयंघोषित भगवान नित्यानंद याच्या संस्थेच्या बेकायदा ताब्यातून आपल्या दोन मुलींची सुटका करावी, या मागणीसाठी एका दाम्पत्याने गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

जनार्दन शर्मा आणि त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या दाव्यानुसार, स्वामी नित्यानंद याच्या बंगळुरू येथील संस्थेत त्यांच्या चार मुलींना दाखल केले होते. त्यावेळी त्यांचे वय सात ते पंधरा होते. नित्यानंद ध्यानपीठमच्या अहमदाबाद येथील शाखेत त्यांना पाठवण्यात आल्याचे त्यांना समजले. तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्या मुलींना भेटू देण्यास पालकांना मज्जाव करण्यात आला. मात्र पोलिसांच्या सहाय्याने त्यांनी आपल्या मुलींची भेट घेतली. त्यातील दोन अल्पवयीन मुलींचा  ताबा मिळवण्यात त्यांना यश आले. मात्र लोपमुद्रा जनार्दन शर्मा (वय 21) आणि नंदिता (वय 18) यांनी त्यांच्या सोबत येण्यास नकार दिला.

आपल्या मुलींचे अपहरण करून त्यांना बेकायदा डांबून त्यांचा छळ केला. त्यांना दोन आठवडे झोपू दिले नाही, अशी फिर्याद त्यांनी आश्रमाविरुध्द नोंदवली आहे. आपल्या मुलींचा ताबा बेकायदा घेणाऱ्या संस्थेच्या ताब्यातून मुलींची सुटका करावी आणि आपल्या ताब्यात द्याव्यात, अशी मागणी शर्मा दाम्पत्याने न्यायालयात केली आहे. त्याचबरोबर तेथे ठेवलेल्या अन्य अल्पवयीन मुलांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी या याचिकेत केली आहे. स्वामी नित्यांदवर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

दरम्यान, याबातचे वृत्त समाज माध्यमांत आल्यानंतर नित्यानंद आश्रमातील व्यक्तींचा विशेषत: लहान मुलांचा कसा छळ करतो, याच्या अनेक कहाण्या यु ट्युबवर येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.